भार्इंदर : अनेक महिन्यांपासून २२९ लाभार्थी कर्मचाऱ्यांना कालबाह्य पदोन्नतीपासून प्रशासनाने सक्षम अर्हतेच्या कारणामुळे वंचित ठेवले आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया २८ मार्चपर्यंत सुरू न केल्यास २९ मार्चला लेखणीबंदचा इशारा रयत राज्य कर्मचारी संघटनेने दिला आहे.राज्य सरकारच्या धोरणानुसार १२ वर्षे सेवा झालेले कर्मचारी कालबाह्य पदोन्नतीसाठी पात्र ठरवले आहेत. त्यानुसार, पालिकेतील ४४१ कर्मचारी पात्र ठरले असून त्यातील केवळ २१२ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने अद्याप पदोन्नती दिली आहे. उर्वरित २२९ कर्मचाऱ्यांना सक्षम अर्हतेच्या कारणास्तव पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. त्यात सफाई कामगारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. काही कर्मचाऱ्यांची सेवा २४ वर्षे झाली असतानाही त्यांनाही पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. पालिकेतील पदोन्नती श्रेणीतील कर्मचाऱ्यांखेरीज राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांना वर्ग-२ चे पद दिले आहे. सरकारच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना दिलेली सुधारित वेतनश्रेणीसुद्धा बंद केली आहे. तत्कालीन महासभेने सुधारित वेतनश्रेणीला मान्यता दिल्यानंतरही लाभार्थी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले आहे. वंचित ठेवलेल्या लाभार्थी कर्मचाऱ्यांना कालबाह्य पदोन्नतीसह सुधारित वेतनश्रेणी देण्याची प्रक्रिया २८ मार्चपर्यंत सुरू करण्याची मुदत संघटनेने प्रशासनाला दिली आहे. (प्रतिनिधी)
२२९ पात्र कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
By admin | Published: March 21, 2016 1:21 AM