मीरा रोड : वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात असलेल्या भाईंदरच्या उत्तन-चौक भागातील सुमारे २२ बोटी बुधवारी सकाळपर्यंत किनाऱ्यावर परतल्या आहेत. काही बोटींशी संपर्क होत नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण होते. कोस्टगार्डने दाेन जहाज व हेलिकॉप्टरच्या मदतीने बोटींना शोधण्यासाठी मोहीम राबवली होती. मासेमारीसाठी गेलेल्या २२ मच्छीमार बोटी समुद्रात असल्याने त्या किनाऱ्याकडे परतण्याची प्रतीक्षा मच्छीमार करत होते. त्यातच काही बोटींशी संपर्क होत नव्हता.
बोटीवर गेलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबातील महिलांनी मंगळवारी मच्छीमार संस्थांच्या कार्यालयात गर्दी केली. समुद्रात गेलेल्या नाखवांचा संपर्क होत नसल्याने कोळी महिला चिंता व्यक्त करत होत्या. त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समुद्रातून परत न आलेल्या बोटींची माहिती घेण्यास सुरुवात केली. उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेच्या एकूण पाच बोटी, डोंगरी चौक सोसायटीच्या १६ व पाली उत्तन मच्छीमार सोसायटीची एक अशा एकूण २२ बोटी मंगळवारी दुपारपर्यंत समुद्रात अडकून होत्या. त्यातील काही बोटींचा संपर्क होत नव्हता.
उत्तन भागातील बोटी समुद्रात अडकल्या असल्याने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्य विभाग, कोस्टगार्ड आदींना कळवल्यावर मंगळवारी तातडीने कोस्टगार्डने दाेन जहाज व एक हेलिकॉप्टरने समुद्रात बोटींची शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी उत्तन बंदरापासून खोल समुद्रात काही बोटी आढळल्या. मंगळवारी व बुधवारी सकाळपर्यंत सर्व बोटी किनाऱ्याला सुखरूप आल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले.
डिझेल, किराणा, मजुरीचे माेठे नुकसान
डोंगरी-चौक संस्थेच्या १० बोटी मंगळवारी रात्री उशिरा व ६ बोटी बुधवारी सकाळी किनाऱ्याजवळ आल्या, असे संस्थेच्या विल्यम गोविंद यांच्याकडून सांगण्यात आले. मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटींना वादळी पावसामुळे रिकाम्या हाताने परतावे लागल्याने त्यांच्या डिझेल, किराणा, बर्फ, खलाशांची मजुरी आदींचे मोठे नुकसान झाले आहे, असे विल्यम म्हणाले.