ठाणे - घोडबंदर भागात मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होत असून त्यातच सेवारस्त्यांची अवस्थाही वाईट असल्याने तेथून वाहने नेणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता युनिअॅबेक्स ते गायमुख या दोन्ही बाजूकडील सेवारस्त्यांची कामे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यावर पुन्हा २२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. एक ते दीड वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर महापालिका खर्च करणार असल्याने प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून यापूर्वी झालेल्या कामांच्या सुमार दर्जास जबाबदार कोण, त्यांना महासभा पाठीशी घालणार का, याकडेही लक्ष लागले आहे.घोडबंदर भागात सध्या मेट्रोच्या कामामुळे कित्येक महिन्यांपासून वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मधल्या काळात सेवारस्ते तयार झाल्यानंतर पालिकेने ते पुन्हा खोदल्याने या रस्त्यांची चाळण झाली होती. त्यामुळे या भागातील वाहतूककोंडीत भर पडली. आता पावसाळा संपल्याने मानपाडापासून पुढे पातलीपाडापर्यंत सेवारस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यात आले. परंतु, तेथून जातानाही वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, आता युनिअॅबेक्स ते गायमुख या दोन्ही बाजूकडील सेवारस्त्यांची कामे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी खर्चाचा अंदाज घेतला जात आहे. तरीही, या रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २० ते २२ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे.महासभेच्या निर्णयाकडे लक्षवास्तविक पाहता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या रस्त्यांची कामे संबंधित विभागाला सांगून आधीच केली होती. त्यासाठी सुरुवातीलादेखील कोट्यवधींचा खर्च केला होता. त्यानंतर अवघ्या एक ते दीड वर्षांत पालिकेनेच ते विविध कारणांसाठी पुन्हा खोदले असून आता त्यांच्यावर कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. यामुळे प्रशासनाच्या निर्णयक्षमतेसह कामांच्या सुमार दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून महासभा काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
सेवारस्त्यांच्या दुरुस्तीवर पुन्हा २२ कोटींची उधळण, यापूर्वीच्या कामांचा सुमार दर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:52 AM