डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील चार मतदारसंघांतून भाजपमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या गुरुवारी पक्षाचे निरीक्षक तथा प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी २२ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात तीन विद्यमान आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. कल्याण पश्चिममधून सर्वाधिक १० जण इच्छुक आहेत. विशेष म्हणजे, कल्याण पश्चिममधील शिवसेना नगरसेविक ा मनीषा तारे यांचे पती व पक्षाचे पदाधिकारी साईनाथ तारे यांनीही भाजपमधून इच्छुक म्हणून मुलाखत दिली आहे.
भाजपच्या डोंबिवली पूर्व मंडल कार्यालयात सकाळी १० ते ११ दरम्यान कल्याण जिल्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी देशपांडे, जिल्हाध्यक्ष व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या चारही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात कल्याण ग्रामीण मतदारसंघात इच्छुक असलेल्यांमध्ये शिवाजी आव्हाड, नंदकिशोर परब, डॉ. सुनीता पाटील, रोहिदास मुंडे, मोरेश्वर भोईर, निलेश पाटील, अॅड. आदेश भगत यांचा समावेश आहे.
डोंबिवलीसाठी राज्यमंत्री चव्हाण आणि महेंद्र रजपूत यांनी मुलाखती दिल्या. कल्याण पश्चिममधून आ.नरेंद्र पवार, संदीप गायकर, वरुण पाटील, साधना रवी गायकर, वैशाली पाटील, महेश जोशी, अर्जुन म्हात्रे, साईनाथ तारे, अर्जुन भोईर, डॉ. चंद्रशेखर तांबडे इच्छुक आहेत. तर, कल्याण पूर्वेसाठी मुलाखत देणाऱ्यांमध्ये आ. गणपत गायकवाड, विष्णू गायकवाड, हर्षल साळवी यांचा समावेश आहे.दरम्यान, विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाते की बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, याबाबतचा अहवाल पक्षनेतृत्वाकडे सोपवल्यावर तेच निर्णय घेतील, अशी माहिती देशपांडे यांनी दिली. गणपतीनंतर शिवसेनेसोबत जागावाटपाची चर्चा होणार आहे. शिवसेना-भाजपची युती कायम असून ही स्वबळाची तयारी नाही. मित्रपक्षालाही याचा फायदा होऊ शकतो, असेही ते म्हणाले.‘त्यांचा’ शिवसेनेशी संपर्क नाहीशिवसेना नगरसेविका मनीषा तारे यांचे पती व पक्षाचे ठाणे ग्रामीण सचिव साईनाथ तारे यांनीही गुरुवारी भाजपच्या वतीने इच्छुक म्हणून मुलाखत दिल्याने शिवसेनेला हा एक धक्का असल्याचे बोलले जाते. यासंदर्भात तारे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकसभा निवडणुकीपासून तारे शिवसेनेच्या संपर्कात नाहीत, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.‘गायकवाड भाजपचेच आमदार’कल्याण पूर्व मतदारसंघातून गणपत गायकवाड यांनी मुलाखत दिली आहे. अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले गायकवाड हे आतापर्यंत भाजपचे सहयोगी आमदार म्हणून ओळखले जात होते. परंतु, मुलाखतीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री चव्हाण यांनी गायकवाड यांनी दोन वर्षांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना सहयोगी म्हणणे उचित नाही. ते आमचेच आमदार आहेत, असे स्पष्टीकरण दिले.