कल्याण - कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पाळल्या गेलेल्या बंदवेळी बुधवारी सायंकाळी कल्याण पूर्वेतील सिध्दार्थनगर येथे झालेल्या तोडफोड आणि मारहाणप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी २२ शिवसैनिकांसह १० भीमसैनिकांना ताब्यात घेतले. याबाबत नाराजी व्यक्त करत गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिकाºयांसह शेकडो शिवसैनिकांनी कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले. या वादाशी शिवसेनेचा संबंध नसतानाही सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी अन्यायकारक कारवाई केल्याचे सांगत त्यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.कोरेगांव भीमा येथे झालेल्या प्रकरणाचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत उमटले. बुधवारी हजारोंच्या संख्येने भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या आंदोलनाच्या काळात दुकाने बंद होती. या दरम्यान जमावाने शिवसेनेच्या शहर शाखेवर हल्ला चढवला. त्याचे पडसाद कल्याण पूर्वेत उमटले. तेथील सिध्दार्थनगर, आनंदवाडी परिसरात तणावाचे वातावरण होते. दोन्ही गट समोरासमोर आल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीहल्ला केला. यादरम्यान पोलिसांनी शिवसेनेच्या कोळसेवाडी शाखेत घुसून शिवसैनिकांना बाहेर काढले. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी पुन्हा लाठीहल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी २२ शिवसैनिकांसह १० भीमसैनिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर कोळसेवाडी परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने तेथे एकच गर्दी झाली होती. त्यांनी घोषणाबाजी करत पोलिसांची कारवाई अन्यायकारक असल्याचे म्हटले. २२ शिवसैनिकांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.भाजपाच्या एका मंत्र्यांच्या इशाºयाने सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी ही कारवाई केल्याने त्यांना निलंबिन करा, अशी मागणी आम्ही केली. जर त्यांना निलंबित केले नाही, तर उग्र आंदोलन करु, असा इशारा महानगरप्रमुख विजय साळवी यांनी दिला.महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा विरोध नव्हता. तरीही काही समाजकंटकांनी शाखांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दलित आणि शिवसेनेत दुरावा निर्माण करण्याचा, भांडण लावून देण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे आम्ही शांतता पाळली, असे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि जेथे दंगा झाला तेथे कारवाई झाली नाही. पण स्वसंरक्षणार्थ शिवसैनिक कोळसेवाडी शाखेत असताना पोलिसांनी अकारण लाठीचार्ज केला. सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी नाहक वातावरण बिघडवले आणि शिवसैनिकांवर हल्ला केला, असा आरोपही लांडगे यांनी केला.शिवसैनिकांवर झालेला लाठीहल्ला अन्यायकारक आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांची कार्यपध्दती चुकीची आहे. जातीय तेढ निर्माण करणाºया समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केल्याची माहिती पालकमंत्री तथा जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करु, असे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना सांगितले.आंदोलकांचा शोध सीसी कॅमेºयाने : डोंबिवली : आंदोलकांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी केलेला रेल रोको, पूर्वेकडील रेल्वेच्या तिकिट खिडकीची फोडलेली काच, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा करणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे आदी गुन्हे लोहमार्ग पोलिसांनी दाखल केले. अचानकपणे जमाव आणून दहशत निर्माण केल्याने आंदोलकांवर दंगल माजवण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात नेमके कोण सहभागी होते, त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. त्यासाठी सीसी कॅमºयांचे फुटेज तपासण्यात येत आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात दीड हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शोधकार्य सुरु करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांनी सांगितले.आंदोलनक र्त्यांवर गुन्हे : कल्याण-डोंबिवलीत बंददरम्यान मोठ्या प्रमाणात रास्ता रोको, तोडफोड करणाºया १०१ आंदोलनकर्त्यांवर बाजारपेठ आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२२ शिवसैनिक, १० भीमसैनिक ताब्यात,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:14 AM