- उमेश जाधवटिटवाळा: ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कल्याण तालुक्यातील ऑनलाइन बदली झालेल्या २२ शिक्षकांना त्यांच्या बदलीच्या शाळेत हजर न राहता आणि कुठेही काम न करता जून आणि जुलै महिन्याचे वेतन दिले आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून २२ शिक्षकांना दिलेली २५ लाखांहून अधिक रक्कम वसूल करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभाप्रमुख धनंजय जोगदंड यांनी केली आहे. तसेच तक्रारींचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत.ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली आहे. नियमानुसार ऑनलाइन पद्धतीने बदली झालेल्या कल्याण तालुक्यातील २२ शिक्षक बदली झालेल्या शाळेत हजर झाले नाहीत. हे सर्व शिक्षक कल्याण तालुक्यातील होते. ते बदली झालेल्या शाळेत हजर न होता उच्च न्यायालयात गेले. याच तालुक्यातील अन्य दोनशेहून अधिक शिक्षक आपल्या बदलीच्या शाळेत हजर झाले आहेत. मात्र त्यांना अद्याप मे महिन्याचे वेतन मिळालेले नाही. न्यायालयात गेलेल्या शिक्षकांच्या बाबतीत प्राथमिक शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाला माहिती देताना वास्तव लपवून ठेवले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यामुळे २२ शिक्षकांनी प्राथमिक शिक्षण विभागाची कोंडी करून आपला स्वार्थ साधला आणि कोणतेही काम न करता चक्क दोन महिन्याचे वेतन आणि १ जुलैची वेतनवाढ घेऊन ३ ऑगस्टला स्वतंत्र समुपदेशनात पुन्हा सोयीच्या शाळांत बदली करून घेतली आहे.या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यासह कल्याण तालुक्यातील तत्कालीन गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून ही २५ लाखांहून अधिक रक्कम वसूल करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केल्यामुळे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. मात्र प्राथमिक शिक्षण आधिकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
अजब कारभार! काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 9:03 PM