ठाणे : ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेल्या सुरक्षारक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळाच्या २२ हजार सुरक्षारक्षकांना केंद्राच्या जीएसटी योजनेचा फटका बसला आहे. सुरक्षारक्षक मंडळाकडे जीएसटी क्र मांक नसल्याने संबंधित कंपन्या, सरकारी कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचे पगार रोखून धरले आहेत. त्यामुळे मुलांच्या ऐन परीक्षांच्या काळात या सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतही सातशेहून अधिक सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्यांचे पगारही थांबवण्यात आले आहेत.माथाडींच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरक्षारक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा ही मंडळे स्थापन केली आहेत. त्यामार्फत विविध संस्था, कंपन्या, सरकारी कार्यालये, बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालमत्तारक्षणासाठी सुरक्षारक्षकांचा पुरवठा केला जातो. या मंडळाकडे २८ हजार सुरक्षारक्षकांची नोंदणी आहे. त्यातील २२ हजार सुरक्षारक्षक विविध आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत. मंडळामध्ये जमा होणाऱ्या वेतन व विविध निधीपोटी लेव्ही जमा होते. त्यातून सुरक्षारक्षकांना वेतन आणि इतर लाभ दिले जातात. मात्र, गेल्या वर्षी केंद्र सरकारने सुरू केलेल्या जीएसटी करप्रणालीमुळे या सुरक्षारक्षकांच्या पगारावर गंडांतर आले आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार हे मंडळ सेवा देणारी संस्था नसल्याने मंडळाला जीएसटी क्र मांक घेणे बंधनकारक नाही. त्यामुळे मंडळाकडे अद्याप जीएसटी क्र मांक नाही. परंतु, जवळजवळ सर्वच कंपन्या आणि आस्थापनांना जीएसटी करप्रणाली लागू असल्याने हा क्र मांक घेतल्याशिवाय कोणालाही पैसे अदा करायचे नाही, असे बंधन असल्याने सुरक्षारक्षकांचे पगार मंडळाकडे जमा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर, हा क्र मांक घेतल्याशिवाय पगाराची रक्कम देता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका राज्यभरातील मंडळाच्या सुरक्षारक्षकांना बसत आहे.ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांत या मंडळाचे ७१२ सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्यांचा दोन महिन्यांचा पगार जीएसटी क्र मांकामुळे थोपवून धरला आहे. पालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून वेतन अदा करण्यासाठी सुरक्षारक्षक मंडळाकडून नोंदणीकृत जीएसटी क्र मांकाची मागणी करण्यात आली आहे.मंडळाकडे तसा क्र मांक नसल्याने पालिकेने सर्व सुरक्षारक्षकांचे पगार थोपवून धरले आहेत. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीचा प्रसंग उभा राहिला आहे.सुरक्षारक्षकांचे मंडळ ही सेवा देणारी संस्था नसल्याने मंडळास जीएसटी क्र मांक बंधनकारक नाही. तसे लेखी पत्र आम्ही ठामपाला दिले आहे. शिवाय, दोन वेळा आमच्या अधिकाºयांनी ठामपाच्या लेखा विभागाची भेट घेऊन त्यांना ही अडचण सांगितली आहे. मात्र, तरीही ते जीएसटी क्र मांकावर अडून बसले आहेत. ही बाब आम्ही केंद्राच्या निदर्शनास आणून देणार आहोत. तोवर पगार थोपवू नयेत. - राजेश आढे, अध्यक्ष, सुरक्षारक्षक मंडळठाणे महानगरपालिका ही आस्थापना सुरक्षारक्षक मंडळ, सानपाडा, नवी मुंबई येथे १४६६ या क्र मांकाने नोंदणीकृत आहे. मंडळाचे ६५४ सुरक्षारक्षक आणि १८ पर्यवेक्षक पालिकेकडे कार्यरत आहेत. त्यांचे वेतन अदा करण्यासाठी केंद्र्राच्या धोरणानुसार मंडळाचा नोंदणीकृत जीएसटी क्र मांक आवश्यक आहे. त्यांनी तो सादर केला, तरच त्यांचे वेतन दिले जाईल. -भानुदास पाटील, सहायक सुरक्षा अधिकारी, ठामपासुरक्षारक्षक मंडळ आणि ठामपाच्या वादात गरीब सुरक्षारक्षकांचे पगार अडकले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुरक्षारक्षकांचे पगार झालेले नाहीत. मुलांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. शाळेची फी भरल्याशिवाय शाळा मुलांना परीक्षेला बसू देणार नाही. शिवाय, घरातही उपासमार सुरू झाली आहे. गरीब सुरक्षारक्षकांचा यात काय दोष?- पाटील, सुरक्षारक्षक
२२ हजार सुरक्षा रक्षकांचा पगार रखडला, परीक्षांच्या काळात कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 3:34 AM