कल्याण : केंद्र सरकारने बँक खाती आणि मोबाइल नंबर आधारकार्डाशी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आधारकार्ड काढणे, तसेच ते बँक आणि मोबाइलशी जोडण्यासाठी धावपळ उडाली. मात्र, कैद्यांना कारागृहाबाहेर येऊन आधारकार्ड काढणे शक्य नाही. त्यामुळे आधारवाडी कारागृहातील कैद्यांचे आधारकार्ड कारागृहात काढण्याचे काम सुभाष रजपूत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी २२६ कैद्यांचे आधारकार्ड काढले आहे. आणखी ९० कैद्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.टिटवाळ्यात राहणारे रजपूत डिसेंबर २०१५ पासून कल्याणच्या बेतूरकरपाडा येथे महा-ई-सेवा केंद्र चालवत आहे. मागील महिनाभरात एक हजार ८०० जणांनी त्यांच्याकडे आधारकार्ड काढले आहे. कल्याण परिसरात ५५ महा-ई-सेवा केंद्रे आहेत. त्यापैकी रजपूत यांच्याच केंद्रात मोफत आधारकार्ड काढण्याची सुविधा आहे. कल्याणमध्ये टपाल कार्यालयात आधारकार्डावरील दुरुस्ती करून मिळते. मात्र, नव्याने आधारकार्ड काढण्याची सुविधा तेथे नाही. टपाल कार्यालय तसेच अन्य महा-ई-सेवा केंद्रात आधारकार्ड नव्याने काढण्याची सुविधाच नसल्याने रजपूत यांच्या केंद्रात नागरिकांची बरीच गर्दी होते. त्यांचे हे काम पाहून आधारवाडी कारागृह प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला. आधारवाडी कारागृहात त्यांनी २२६ कैद्यांचे आधारकार्ड काढले आहे. आणखी ९० कैद्यांचे आधारकार्ड लवकरच काढले जाणार आहे.रजपूत हे एका महा-ई-सेवा केंद्रात कामाला होते. त्याची चांगली माहिती झाल्यावर त्यांनी सरकारकडे अर्ज केला. सरकारकडून त्यांना महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली. २०१५ पासून ते यशस्वीरीत्या हे केंद्र चालवत आहेत.आधारकार्डवरील नाव, पत्त्यात करा सुधारणा; कल्याण, उल्हासनगरमध्ये सुविधा-डोंबिवली : भारत संचार निगमने सुरू केलेल्या (बीएसएनएल) आधारकार्ड अपडेट केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. कल्याण व उल्हासनगरमध्ये तीन केंद्रे सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बीएसएनएलने सुरू केलेल्या या केंद्रांमुळे आता आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी बीएसएनएलचे महाव्यवस्थापक हरिओम सोलंकी उपस्थित होते. कल्याणमधील काळातलाव परिसरातील टेलिफोन एक्स्चेंज केंद्र, कल्याण येथील केंद्रीय तार कार्यालय भवन आणि उल्हासनगर येथील गोल मैदानात ही केंद्रे सुरू केल्याचे पाटील म्हणाले. भिवंडी व वसई येथील दूरसंचार कार्यालयात लवकरच केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. रविवारची सुटीवगळता दररोज सकाळी १० ते सायं. ५.३० पर्यंत ही केंद्रे सुरू राहतील. ‘आधार’मध्ये काही चुका असल्यास त्या नागरिकांना या केंद्रांमध्ये सुधारता येतील. पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडीमध्ये पुरावे पाहून बदल केले जातील.
‘आधारवाडी’तील २२६ कैद्यांना मिळाले ‘आधार’, ‘महा ई-सेवा’ केंद्रामार्फत मिळवून दिला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:01 AM