अनिकेत घमंडी / डोंबिवलीकेडीएमसीच्या हद्दीतील २७ गावे आणि दिव्याला अतिरिक्त २५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. असे असले तरीही केडीएमसी थकीत पाणीबीलापोटी २३३ कोटी रुपये देणे आहे. ते कधी देणार?, असा सवाल एमआयडीसीने केला आहे. मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये महापालिकेने अवघे पाच कोटी रुपये अशाच एका बैठकीनंतर दिले होते. त्यानंतर प्रतीमहिना पाच कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले आहे.पाणीबिला पोटीची निव्वळ थकबाकी ही ६४ कोटी ९१ लाख रुपयांची आहे. त्यापैकी ४५ कोटी १८ लाख रुपये हे केडीएमसीने, तर पूर्वीचे २७ गावांचे १९ कोटी ७३ लाख रुपये बील थकीत आहे. त्यावर १४० कोटी ६१ लाख रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे असे मिळून एकूण २३३ कोटी रुपये थकीत आहेत. महापालिका क्षेत्रासाठी पाच तर २७ गावांसाठी ३५, असे एकूण ४० एमएलडी पाणी एमआयडीसी सध्या केडीएमसीला पुरवत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १५ टक्के गळती गृहित धरली असून, त्यात पाणी चोरी, पाणी गळती, तसेच तूटही आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.थकीत बिलाची रक्कम सोडून एमआयडीसी दर महिन्याला महापालिकेला ९० लाख ते एक कोटी रुपयांचे पाणीबिल पाठवते. त्यापैकीही केवळ ५० टक्केच बील यंदाच्या वर्षी महापालिकेने भरले आहे, अशी माहिती समोर आली आहे. एकूण वर्षभरात २७ गावांचे आठ कोटी ३८ लाखांपैकी चार कोटी ६६ लाख भरले आहेत. महापालिकेला वितरित होणाऱ्या पाण्यापैकी एक कोटी तीन लाखांपैकी अवघे १४ लाखांचे बील वसूल करण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोट्यवधींच्या थकीत बिलाचा प्रश्न आताचा नसून तो अनेक वर्षांपासून आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य तो तोडगा काढावा. त्यानंतर महापालिका आणि एमआयडीसीचे अधिकारी बसून योग्य तो निर्णय घेतील. त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली
पाण्याचे थकीत २३३ कोटी कधी देणार?
By admin | Published: May 03, 2017 5:26 AM