ठाणे : ठाणे जिल्ह्यातील २३५ आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यातील केवळ १० नोंदणी केंद्र सुरू असल्याचे दिसून आले. याची गंभीर दखल घेऊन सर्वच्या सर्व केंद्र तत्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी महाआॅनलाइनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले.आधारकार्ड नोंदणीसंदर्भातील समस्या व त्याचा गैरफायदा घेऊन ठिकठिकाणी नागरिकांची होत असलेली लूट याबाबत ‘लोकमत’ने ‘ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर आधारकार्डसाठी विनापावती वसुली’ या शीर्षकाचे वृत्त ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. केंद्र सरकारने मोबाइल क्रमांक आधारशी जोडणे अनिवार्य केले असल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणकर यांनी जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्र व युनिटचा आढावा घेतला.राज्य शासनाने सीएससी-एसपीव्ही यांच्याकडील सर्व आधारनोंदणी संच शासनाच्याच अखत्यारीतील महाआॅनलाइनला हस्तांतरित केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील २४५ पैकी केवळ १६० आधारनोंदणी केंद्र हस्तांतरित झाले आहेत. त्यातील फक्त १० संच जिल्ह्यात ठिकठिकाणी काम करत असल्याचे निदर्शनात येताच त्यांनी गंभीर दाखल घेतली असून तातडीने सर्व संच सुरू करावेत, असे माहिती तंत्रज्ञान विभागाला कळवले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्या कार्यालयातील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती महाआॅनलाइनने केली असता त्यानुसार ठिकठिकाणच्या जागादेखील उपलब्ध केल्या आहेत. मात्र, आधार केंद्रे कार्यान्वित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे आधारकार्डासाठी होणारी पैशांची वसुली थांबेल, अशी आशा आहे.दरम्यान, नागरिकांची आधार अपडेशनबाबत गैरसोय होऊ नये, म्हणून ठाणे येथील मुख्य टपाल कार्यालय तसेच उपटपाल कार्यालय, दमाणी इस्टेट, हरी निवास सर्कल, नौपाडा, तर कल्याण येथील मुख्य टपाल कार्यालय, टिळक चौक, कल्याण रेल्वेस्टेशनजवळील उपटपाल कार्यालय, उपटपाल कार्यालय, प्लॉट क्र . १४, दत्त मंदिराजवळ, सेक्टर १७, ऐरोली या ठिकाणी अपडेशनची सुविधा देण्यात आली आहे.
सुधारित आज्ञावली वापरावीआधार माहिती अद्ययावत करण्यासाठी सध्या ECMP Client ही आज्ञावली वापरण्यात येते. मात्र, त्यामुळे अपडेशनसाठी १५ दिवसांचा विलंब लागतो. मोबाइल अपडेशन जलदगतीने व्हावे, म्हणून यूआयडीएआयने Update Client Lite हे व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे. परंतु, या नव्या आज्ञावलीचा वापर होत नाही. त्यामुळे तो करावा, असे पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयाने महाआॅनलाइनच्या जिल्हा समन्वयक यांना दिले आहे.