ठाणे : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातून टँकरची मागणी झाल्यास ती जलदगती पूर्ण करा अशा सूचना अधिकाऱ्यांना करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील शहरी भागांत नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या पाणीकपातीत वाढ होणार नसल्याचे बुधवारी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. त्याचबरोबर येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या योजनांची माहितीही घेतली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३५ गावे आणि पाड्यांसाठी ३६ टॅँकर सुरू आहेत. त्यामध्ये शहापूर तालुक्यात २९ तर मुरबाड तालुक्यात ७ टॅँकरचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाण्याची पातळी १२० फुटांच्याही खाली गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाणीपुनर्भरण करण्याची गरज असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी ज्या गावातून अथवा पाड्यातून टँकरची मागणी येईल, ती गावे व पाड्यांची तहसीलदार व गटविकास अधिकाºयांनी तत्काळ पाहाणी करून प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात यावा अशा सूचना केल्या.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेलांना मंजुरी दिली आहे. विंधन विहीरी, नवीन नळपाणीयोजना आठवडाभरात सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर जे भाग उंचावर आहेत, त्या ठिकाणी मोठे टँकर जाऊ शकत नसतील तर तेथे छोटे टँकर पाठवण्याची व्यवस्था करावी असेही त्यांनी अधिकाºयांना सांगितले.शहरी भागात तूर्तास मुबलक पाणी : जलसंपदा व एमआयडीसीकडून जिल्ह्यातील पाण्याची स्थिती जिल्हाधिकाºयांनी जाणून घेतली. त्यानुसार, शहरी भागातील पाच महापालिकांसह दोन नगरपालिकांना १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू केलेल्या पाणीकपातीत वाढ करण्यात येणार नाही. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
२३५ गावांना टँकरने पाणी; शहरात वाढीव पाणीकपात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:44 AM