लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : एमएस-सीआयटी परीक्षा वेळेत उत्तीर्ण न झाल्याने केडीएमसीतील २४ निवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतनासाठी फरफट सुरू आहे. त्यांच्याव्यतिरिक्त ५४८ कर्मचाऱ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण न केल्याने हा निवृत्तीवेतनापासून वंचित राहण्याचा आकडा भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.गतिमान प्रशासन, पेपरलेस कारभार करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. हे प्रशिक्षण डिसेंबर २००७ पर्यंत घेणे आवश्यक होते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सरकारने दोनदा संधी दिली होती. ती उत्तीर्ण न झाल्यास संबंधितांना वेतनवाढ तसेच निवृत्तीवेतन मिळणार नाही, असा आदेशही काढला होता. वर्ग-१ ते ३ मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही एमएस-सीआयटीची परीक्षा आहे. केडीएमसीतील एकूण ५७२ कर्मचारी अजूनही ही परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. त्यातील २४ कर्मचारी निवृत्त झाले आहेत. परंतु, परीक्षा न दिल्याने त्यांना निवृत्तीवेतनापासून वंचित राहावे लागले आहे. या निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये विहीत कालावधीनुसार निवृत्त होणारे, मृत्यू झालेले तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी आणि निवृत्त शिक्षकही आहेत. एमएस-सीआयटी परीक्षा वेळेत पास न झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ वसूल करण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे. यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून निवृत्तीवेतन लागू करण्यासाठी पाठवलेले प्रस्ताव लेखा विभागाकडून आक्षेप नोंदवून संबंधित विभागाला परत पाठवण्यात आले आहेत.
निवृत्तीवेतनापासून २४ कर्मचारी वंचित
By admin | Published: June 10, 2017 1:05 AM