ठाणे: फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी ओळख करणे ठाण्यातील ६३ वर्षीय जेष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. एका मस्ती नावाच्या जाहिरातीकडे त्यांना आकृष्ट करुन या महिलेने त्यांना इंडियन एस्कॉर्टमध्ये नोकरी देण्याचे अमिष दाखविले. याच अमिषाने त्यांची २४ लाख ५५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी बुधवारी दिली.
ठाण्यातील नौपाडा भागात हे सेवानिवृत्त गृहस्थ वास्तव्याला आहेत. ते ५ मार्च २०२३ ते ७ आॅगस्ट २०२३ या कालावधीमध्ये त्यांची घरी होते. याच दरम्यान, त्यांची फेसबुकवर किरण आणि कल्पना चौधरी नामक महिलांशी ओळख झाली. आपण इंडियन एस्कॉर्ट सर्विसेस क्लबमधून बोलत असल्याचीही त्यांनी बतावणी केली. याच क्लबमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरीही देणार असल्याचा बहाणा त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी एका व्हॉटसअॅप क्रमांकावरुन सिया शर्मा, मेघा आणि कामिनी या बनावट नावाचे फोटो पाठवून त्यांच्याशी बोलण्यासाठी तसेच त्यांची क्लबची (इंडियन एस्कॉर्ट सर्विसेस) फी भरायची असल्याची बतावणी केली.
अशाच प्रकारे त्यांची दिशाभूल करीत या क्लबच्या बँक खात्याच्या क्रमांकावर जीपे आॅनलाईन पद्धतीने २४ लाख ५५ हजार रुपये आॅनलाईन वळते करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवली. त्यानंतर ब्लॅकमेल करीत पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी ही रक्कमही भरली. पुढे तुमच्या पत्नीने आमच्या बॉसला फोनवर त्रास दिल्याचे कारण देत त्यांचे पैसेही परत केले नाही. तसेच त्यांना नोकरीही दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या गृहस्थाने नौपाडा पोलिस ठाण्यात ८ आॅगस्ट रोजी किरण, कल्पना चौधरी आणि सरिता या तीन महिलांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.