मीरा रोड : काशिमीरा भागातील बार, हॉटेल तसेच चित्रीकरणाच्या ठिकाणी छापा टाकून २४ बालमजुरांची बुधवारी सुटका करण्यात आली. बालमजूर ठेवणा-या आस्थापनांना नोटिसा बजावल्या असून दोन दिवसांत गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेल्फेअरने दिली.त्यांच्या प्रतिनिधींनी ठाणे ग्रामीण व काशिमीरा पोलिसांच्या सहकार्याने छापे टाकले. वरसावेनाका येथील प्रसिद्ध फाउंटन या हॉटेलमध्ये २१ बालमजूर आढळले. यातील १४ ते १५ वर्षे वयोगटांतील १५ बालमजुरांची सुटका केली. तर, ६ मुले १५ वर्षांपेक्षा मोठी असल्याचा दावा मालकाने केला. त्यांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. हिल व्ह्यू बारमधून ३, हॉटेल श्रीकृष्णमधून २, हॉटेल चायना किंग, सुरेखामधून प्रत्येकी एका बालमजुराची सुटका करण्यात आली. चेणे येथे बाबा रामदेव या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना तेथे बालकलाकार म्हणून कुठलीही परवानगी नसताना बालमजूर आढळल्याने त्यांचीही सुटका केली. बारसाठी १८ वर्षांवरील तर सध्या हॉटेलसाठी १५ वर्षांवरील मुलांनाच कामाला ठेवता येते. पण बार, हॉटेलसह अन्य आस्थापना बालमजुरांना राबवून त्यांचे शोषण करतात. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे संस्थेने सांगितले.
काशिमीरामधून २४ बालमजुरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:28 AM