मीरारोड - बसमधील प्रवाशांचे तसेच घराचे दार-खिडकी उघडे पाहून मोबाईल चोरणाऱ्या दोघा सराईत चोरांना काशीमीरा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्या कडून चोरीचे २४ मोबाईल हस्तगत केले आहेत. माशाचा पाडा येथे राहणारे अनिल प्रजापती यांनी रात्री खिडकी जवळ ठेवलेला मोबाईल चोरीला गेला होता. तर मनोहर काजरेकर हे फाउंटन सिग्नल येथील बस स्टॉप वरुन बसमध्ये बसत असताना त्यांचा खिशातील मोबाईल चोरण्यात आला होता.
या मोबाईल चोरीच्या गुन्ह्या प्रकरणी उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निरीक्षक समीर शेख, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक शिवाजी खाडे सह अनिल पवार, दिपक वारे, प्रताप पाचुंदे, अक्षय पाटील, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, स्वप्निल मोहीले, निकम, रवी कांबळे, प्रविण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सुर्यवंशी हे तपास करत होते. प्रजापती यांच्या मोबाईल चोरी प्रकरणी आतिश सिंग रा. दहीसर, मुंबई ह्याला काशीमीराच्या डाचकुलपाडा भागातून पकडले. त्याच्याकडे ४६ हजार ५०० रुपये किमतीचे तब्बल १२ चोरीचे मोबाईल सापडले. तर काजरेकर यांच्या मोबाईल चोरी प्रकरणात जुबेर जाफर कच्ची (२४) रा-राबोडी, ठाणे याला घोडबंदर रोड भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५९ हजार किमतीचे १२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.