डोंबिवली: राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली युनिटने गुरूवारी सकाळी कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गावाच्या हद्दीत २४० लीटर गावठी (हातभट्टी)ची दारू एका कारमधून जप्त केली. या कारवाईत १ लाख ६८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान दारूची वाहतूक करणारी व्यक्ति पसार झाली आहे.
पिसवलीतील महात्मा गांधी रोडवरील बिस्मिल्ला चिकन शॉपच्या बाजुला, देशमुख होम्स समोर ही कारवाई करण्यात आली. पिसवली गाव हद्दीत एका कारमधून गावठी दारुची वाहतूक होणार असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवली विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील यांना मिळाली.
पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक एम. एस. होळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एच. एम. देवकाते, शिवराम जाखीरे यांच्या पथकाने कल्याण-शीळ रस्त्यावरील पिसवलीत सापळा लावला आणि बातमीदारामार्फत मिळालेल्या वर्णनानुसार या भागात उभ्या असलेल्या कारची तपासणी केली. त्या कारमध्ये गावठी दारुचे सहा कॅन आढळून आले. कारच्या पाठीमागील सीटवर हे कॅन ठेवले होते. संबंधित कार ही मुंबईतून आल्याची प्राथमिक माहीती मिळाली असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहीती निरीक्षक पाटील यांनी दिली.