लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानुसार, विलगीकरण, जनरल, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागातही त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली असून, ग्रामीण भागातही लहान मुलांसाठी बेडची व्यवस्था केल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. त्यानुसार, ठाण्यासह जिल्ह्यात २४ हजार २१ बेड सज्ज आहेत, याशिवाय लहान मुलांसाठी ठाण्यात जिल्हा आरोग्य विभागामार्फत मनोरुग्णालय येथे १०० बेड आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून १०० बेड सज्ज ठेवले आहेत.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे प्राण गेले. कुठे ऑक्सिजनची कमतरताही भासली होती, परंतु आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांतील यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली असून, त्या ठिकाणीही जास्तीचे बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातही तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना अधिक असल्याने, त्या दृष्टीने मुलांसाठीही वेगळ्या बेडची व्यवस्था केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात २४ हजार २१ बेड सज्ज असून, त्यातील ऑक्सिजनचे १० हजार ५७०, व्हेंटिलेटरचे १,०७४, आयसीयूचे ३,२११ अशा पद्धतीने बेड सज्ज ठेवले आहेत.
ग्रामीण भागातही ५ हजार ७१५ बेड सज्ज
ठाणो जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणो ग्रामीण भागात कोरोनाबाधित इतर रुग्णांसाठी ४,४७० बेड आणि लहान मुलांसाठी एक हजार २४५ बेडची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. लहान मुलांच्या एक हजार २४५ बेडमध्ये विलगीकरणाचे ७०० बेड, ऑक्सिजनचे ४५५, आयसीयूचे ५०, खासगी रुग्णालयात ३० आयसीयूचे आणि व्हेंटिलेटरचे १० बेड सज्ज आहेत.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ५,३९,८७६
बरे झालेले रुग्ण - ५,२२,८२७
मृत्यू - १०,८९२
३१ टक्के लोकांचेच पूर्ण लसीकरण (ग्राफ)
१८ वर्षे वयोगटांवरील एकूण लोकसंख्या -४१,७५,८११
एकूण लसीकरण - २२,५१,६०८ टक्केवारी - ३१
पहिला डोस - १६,७०,७५९ टक्केवारी - २३
दुसरा डोस - ५,८०,८४९ टक्केवारी - ८
१२ ऑक्सिजन प्लांट सज्ज
ठाण्यासह जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जवळजवळ १२ ऑक्सिजन प्लान्ट सज्ज झाले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत महापालिकेच्या माध्यमातून तीन प्लान्ट सज्ज असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात एका प्लान्टचे काम सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीत एक प्लान्ट अंतिम टप्प्यात आला आहे, तर एक प्लान्ट आणखी उभारला जाणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी एक, उल्हासनगर एक आणि मीरा-भाईंदरमध्ये २ आणि ठाणे ग्रामीणमध्ये सावध येथे एक प्लान्ट उभारण्यात आला आहे.
दुसऱ्या लाटेत दररोज किती ऑक्सिजन जिल्ह्याला लागले?
जिल्ह्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेने ऑक्सिजनची चिंता वाढविली होती. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिकचा ऑक्सिजन लागला होता.
२७४ सेंटर्स
ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी २७४ सेंटर सज्ज आहेत, तसेच या ठिकाणी २४ हजार २१ बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ऑक्सिजनचे १०,५७०, व्हेंटिलेटरचे १,०७४, आयसीयूचे ३,२११ बेड सज्ज आहेत.
लहान मुलांसाठी वेगळे केअर सेंटर
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेने तयारी केली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या शेजारी असलेल्या जागेत १०० बेड्स लहान मुलासाठी राखीव ठेवले आहेत, तर ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनही पार्किंग प्लाझा कोविड सेंटर येथे लहान मुलांसाठी १०० बेड सज्ज आहेत.
............
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन, बेड, लहान मुलांसाठी वेगळे बेड आदींसह इतर सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
(कैलास पवार - जिल्हा शल्यचिकित्सक - ठाणे)