ठाणे : ठाणे महानगरपालिकेने रेल्वेने येणारे प्रवासी आणि परप्रांतीय मजुरांसाठी ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात सुरू केलेल्या अॅण्टीजन टेस्ट केंद्रात ३० आॅगस्ट ते २९ सप्टेंबर या एका महिन्यात तब्बल २४ हजार ४०७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. या टेस्टमध्ये २६९ कोरोनाबाधित रु ग्ण सापडल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या या केंद्रामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळाले आहे. या ठिकाणी दिवसाला एक हजार कोरोना चाचण्या होत असून अॅण्टीजन टेस्टचा निकाल अवघ्या काही मिनिटांत मिळत असल्याने बाधित व्यक्तींना तातडीने विलगीकरणात ठेवून कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.
ठाणे शहरात अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू होताच वर्दळ वाढू लागली. कोरोना संक्र मणकाळात आपल्या घरी परतलेल्या परप्रांतीय मजूर आणि नागरिकांची घरवापसी सुरू झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर त्यांच्या अॅण्टिजन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.चार वैद्यकीय पथके तैनातसुरुवातीच्या काळात सॅटिसवर दोन वैद्यकीय पथके तैनात करून त्या पथकांच्या माध्यमातून टेस्ट करण्यात आल्या. त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद बघून सॅटिसखालीदेखील दोन अतिरिक्त वैद्यकीय पथके तैनात करून त्यांच्या साहाय्याने टेस्ट वाढवण्यात आल्या. आजघडीला या ठिकाणी चार वैद्यकीय पथके तैनात केली असून त्यांच्या माध्यमातून ९०० ते १००० चाचण्या करण्यात येत आहेत. चार वैद्यकीय पथकांंमध्ये चार डॉक्टर्स, चार नर्सेस व आठ वॉर्डबॉय आणि १० मदतनीस यांचा समावेश आहे.