शेणवा : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवल्या गेलेल्या शहापूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवसात तालुक्यात २५ नवे रुग्ण आढळून आले असून आदिवासी विभागाच्या कुल्हे (शेणवे) येथील मुलींच्या आश्रमशाळेतील १० विद्यार्थिनींना कोविडची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली. आमदार दौलत दरोडा, तालुका प्रकल्प अधिकारी आर किल्लेदार, डॉ. दत्तात्रय धरणे यांनी गुरुवारी आश्रमशाळेला भेट दिली. शहापूर तालुक्यातील वासिंदमध्ये चार, शहापूर दोन, खर्डी एक, कसारा एक, टेंभुर्ली पाच, कुल्हे १०, आदिवली एक, गेगाव एक अशा नव्या २५ रुग्णांची भर पडल्याने भीतीचे वातावरण आहे. शहापूरमधील एकूण बाधितांची संख्या ३ हजार ८२८ वर पोहोचली असून मृतांची संख्याही १२६ झाली आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही शहापूरच्या किन्हवली, शेणवा, डोळखांब, कसारा या भागातील काही शाळा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून सुरूच ठेवण्यात आल्याची चर्चा असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कोरोना बाधित १० विद्यार्थिनींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर ८४ विद्यार्थिनींना आश्रम शाळेतच क्वारंटाईन करून ठेवण्यात येणार आहे
अशी माहिती आमदार दरोडा यांनी दिली.