लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्याचा शहरी व ग्रामीण भाग ‘ब्रेक दी चेन’च्या तिसऱ्या स्तराचे उपाय अंगी बाळगून वावरत आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही कमी झालेली आहे. याशिवाय सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांहून सध्या चार हजार ५९९ वर आली. मात्र, गेल्या तीन महिन्यांचा तुलनात्मक विचार करता आजही या सक्रिय रुग्णांमधील ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर २५ टक्के गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यानुसार आजही एक हजार १५६ रुग्ण ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या उपचाराखाली तग धरून आहेत.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा कहर कमी करण्यासाठी सध्या ‘ब्रेक दी चेन’च्या उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. या उपाययोजनांच्या प्रारंभी ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसऱ्या स्तराच्या उपाययोजना हाताळल्या. मात्र, वेळीच सावधान होऊन राज्य शासनाने महापालिकांसह सर्व जिल्हे तिसऱ्या स्तरात आणून ‘ब्रेक दी चेन’चे गांभीर्य निदर्शनास आणले. कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी २९ एप्रिलपासून हे निर्बंध पुढे १५ मेपर्यंत लागू केले. त्यात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून ते १ जूनपर्यंत आणि आतापर्यंत आपण ‘ब्रेक दी चेन’च्या तिसऱ्या स्तराच्या निर्बंधात वावरत आहोत.
सक्रिय रुग्ण आणि उपचाराखाली असलेली रुग्णसंख्या विचारात घेऊन सध्याच्या तिसऱ्या स्तरातून सुटका होण्याची आशा पल्लवित झालेल्या आहेत; परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पदार्पण झाले तरीदेखील निर्बंधांतून मुक्ती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. याविरोधात संघटित व्यापारीवर्ग जिल्ह्यात आवाज उठवत आहे. १२ मेपासून आजपर्यंतच्या सक्रिय रुग्णसंख्येचा विचार करता गंभीर रुग्णसंख्या आजही २५ टक्के आहे. मेच्या यादिवशी २१ हजार ९५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यातील २५ टक्के म्हणजे चार हजार ८८७ रुग्ण ऑक्सिजन व १५६ व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते.
......