सर्व आयारामांना संधी : बंडखोरी रोखण्यासाठी यादी शेवटच्या दिवशी अजित मांडके , ठाणेठाण्याचा बालेकिल्ला राखताना शिवसेनेसमोर सर्वात मोठे आव्हान असेल, ते बंडखोरांचे. ‘मला बंड करून अंगावर येणारे सैनिक नकोत’, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असला, तरी आयारामांच्या वाढत्या संख्येमुळे, त्यांना मिळणाऱ्या संधीमुळे आणि प्रस्थापितांना पुन:पुन्हा मिळणाऱ्या वरदहस्तामुळे शिवसेनेत धगधगणाऱ्या असंतोषाला वाट फुटण्याची भीती पक्षात आहे. त्यामुळेच २५ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले आहे. त्यानंतरही जुन्याजाणत्या, निष्ठावंत, कट्टर सैनिकांतील नाराजी पुरेशी शमलेली नाही.युती तुटल्याचे शिवसेनेतर्फे जाहीर होताच भाजपाने लागलीच जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेच्या नेत्यांवर टोलेबाजी केली. सेनेसह अन्य पक्षातील आणखी आयाराम गळाला लावण्याची भाजपाची रणनीती आहे. युती संपुष्टात आल्यावर भाजपाने शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेवर आगपाखड केली. आता शिवसेनाही त्याच तोडीचे उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेनेने पक्षीय मेळावा घेण्याऐवजी विभागीय मेळावे घेण्यावर भर दिला आहे. त्यानुसार, शुक्रवारी शहरातील विविध भागांत तब्बल १० हून अधिक मेळावे पार पडले.वचननामा जाहीर करतानाच भाजपाला चोख प्रत्युत्तर देण्याचा विचार सेनेने केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत वचननामा जाहीर होणार आहे. मालमत्ता करमाफीबरोबर या वचननाम्यात आणखी कोणते नवे मुद्दे असतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेत २५ टक्के नवे चेहरे
By admin | Published: January 30, 2017 1:59 AM