ठाणे : घोडबंदर रोडवरील अशोक स्मृती या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वायरिंग केबिनला शुक्रवारी सकाळच्या सुमारास आग लागली. ही आग सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. वेळीच इमारतीच्या सुरक्षारक्षक आणि दक्ष नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीच्या धुरामुळे इमारतीतील वृद्ध आणि लहान मुले अडकली होती, त्यांना ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी नेले. जवळपास २०-२५ जणांना बाहेर काढले असून, या बचाव कार्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
घोडबंदर रोडवरील कासारवडवली पेट्रोल पंपाच्या परिसरात तळ अधिक १३ मजली अशोक स्मृती इमारत आहे. या इमारतीच्या तीन मजल्यांवरील वायरिंग केबिनमध्ये आग लागली. ती हळूहळू सहाव्या मजल्यावर गेली. आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीच्या सुरक्षारक्षकाने स्थानिक दक्ष नागरिकांच्या मदतीने अग्निरोधकाचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविले. मात्र, केबिनला आग लागल्याने प्रचंड धूर झाला, त्यातच तो बाहेर जाण्यासाठी जागा अपुरी असल्याने धूर इमारतीमध्ये पसरला. त्यातच इमारतीत वयोवृद्ध आणि लहान मुले मात्र या धुरामुळे घरात अडकून पडली होती. आगीची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष व महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धूर पाहून अग्निशमन व कक्षाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रथम अडकलेल्या वयोवृद्ध, लहान बालके आणि आजारी रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात केली. जवळपास एक ते दीड तास हे बचाव कार्य सुरू होते. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज कक्षप्रमुख संतोष कदम यांनी वर्तविला.