कल्याण : कोरोना रुग्णांचे घरोघरी जाऊन महिनाभर सर्वेक्षण केलेल्या २५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केडीएमसीने अद्याप मानधन दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी मानधनाच्या मागणीसाठी मंगळवारी मनपा मुख्यालयात धाव घेतली होती. कोरोना रोखण्यासाठी मनपा ३५ कोटी रुपये खर्च करते. मात्र, आम्ही जीव धोक्यात घालून सर्वेक्षण केले असतानाही मानधन का दिले जात नाही, असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांनी केला.
सिद्धी आहेर या विद्यार्थिनीने सांगितले की, ‘कोरोना सर्वेक्षणासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणारे स्वयंसेवक हवेत, असे आवाहन मनपाने केले होते. त्यानुसार आम्ही २५ जण मनपाकडे आलो. १५० घरांचे सर्वेक्षण केल्यास त्याच्या मोबदल्यात एका विद्यार्थ्याला ३५० रुपये दिले जातील, असे मनपाने सांगितले होते. १५ जुलै ते १५ आॅगस्टदरम्यान आम्ही सर्वेक्षण केले. सुरुवातीला मनपाने पीपीई किट दिले. त्यानंतर पुढील २८ दिवसांत पीपीई किट व हातमोजे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही आम्ही सर्वेक्षण केले. मात्र, आम्हाला मानधन दिलेले नाही.
मानधनासाठी बँकेत स्वत:चे खाते काढा, त्यात मानधनाची रक्कम जमा केली जाईल, असे सांगण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांकडे पॅन कार्ड नसल्याने त्यांचे खाते उघडले गेले नाही. ज्यांचे खाते उघडण्यात आले त्यांच्या खात्यात मानधन जमाच झालेले नाही. काहींनी कोरे धनादेश देऊनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तर, आता १५० घरांच्या सर्वेक्षणापोटी १५० रुपये देण्यात येतील, असे सांगितले जात आहे. हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला आमचे मानधन द्यावे.’ या वेळी कृष्णा भाटी, श्रृती माने, अक्षय इंगळे, गौरी शर्मा, काजल सावंत आदी विद्यार्थीही उपस्थित होते.
दरम्यान, यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २७ जुलैला सुधारित आदेश जारी केले होते. स्वयंसेवकांना सर्वेक्षणाच्या कामासाठी १५० घरांपोटी दिवसाला ३५० रुपये मानधन दिले जाईल. घरांची संख्या कमी करावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार १०० घरांपोटी ३५० रुपये देण्यात येतील. मात्र, सर्वेक्षण केलेल्या घरांची संख्या कमी असल्यास मानधनात कपात केली जाईल, असे नमूद केले होते. प्रभाग अधिकारी खात्यात रक्कम जमा करणार याविषयी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, संबंधित विद्यार्थ्यांचे मानधन प्रभाग अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.