कल्याण : ५० हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे बाळगत असाल तर सोबत त्याचे योग्य ते पुरावे ठेवा तसेच १० हजारांपेक्षा जास्त किमतीची भेटवस्तू, प्रचार साहित्य आणि मद्य आदींचे मतदारांना आमिष दाखवणे अथवा प्रलोभनासाठी वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई अटळ असल्याची माहिती केडीएमसी आचारसंहिता कक्षप्रमुख तथा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या २५ लेखी तक्रारी प्राप्त झाल्या असून ६ गुन्हे दाखल केल्याचे ते म्हणाले.केडीएमसीच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू असून यात पैशांचा खेळ होणार, अशी शक्यता पाहता महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम या विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. तर, उपायुक्त लेंगरेकर यांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता कक्ष कार्यरत आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमला तपासणीदरम्यान कल्याणच्या दुर्गा चौकात एका गाडीत ८ लाख रुपये नुकतेच आढळले आहेत. संबंधित व्यक्तीला याबाबत पुरावे मागितले असता देता आले नाही. त्यामुळे ही रककम स्थानिक बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केली असून याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रोकड बाळगत असाल तर त्याचे पुरावे ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. केडीएमसी क्षेत्रात १२ निवडणूक विभाग असून प्रत्येक विभागात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी चार पथके तैनात केली आहेत. याव्यतिरिक्त अन्य चार विशेष पथकांचाही वॉच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आचारसंहिता भंगाच्या २५ तक्रारी, सहा गुन्हे दाखल
By admin | Published: October 28, 2015 11:18 PM