- स्नेहा पावसकर
ठाणे : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याने श्रीमंत असो वा गरीब, कुणीही पैशांचा विचार न करता इस्पितळाची महागडी बिले भरली, दामदुप्पट किमतीची औषधे खरेदी केली तसेच रुग्णवाहिकेकरिता भरमसाट पैसे मोजले. ग्राहक या नात्याने त्यांची केवळ ठाणे जिल्ह्यात किमान २५० कोटी रुपयांची लूटमार केली गेली असल्याचे ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या गेल्या नऊ महिन्यांच्या काळात रुग्णालये, मेडिकल एजन्सीज मालामाल झाल्या. मात्र, रुग्णांचे आजारपणाने हाल झाले आणि एक ग्राहक या नात्याने सरत्या वर्षात त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. आपल्याला दरोडेखोरांच्या टोळ्या बनून रुग्णालये, औषधविक्रेते, रुग्णवाहिका चालक लुटत असल्याचे जाणवत असतानाही अनेकांनी मुकाट्याने हे अत्याचार सहन केले. कोरोना उपचारानंतर खासगी रुग्णालयांनी अवाजवी बिले वसूल करीत गोरगरीब रुग्णांचे खिसे कापले. अनेकांनी ती बिले भरली. मात्र, सातत्याने रुग्णालयांचे हेच प्रकार सुरू राहिल्याने अखेर सरकारने या लुटीची दखल घेत पालिकांना रुग्णांच्या बिलांचे परीक्षण करून घेण्यास सांगितले. ठाण्यात लेखापरीक्षकांनी केलेल्या तपासणीत सुमारे पावणेदोन कोटींच्या आक्षेपार्ह बिलांचा झोल समोर आला. आवाज उठवल्यावर काही रुग्णांना त्यांचे पैसे परत मिळाले. मात्र, ज्यांनी तक्रार केली नाही, अशा असंख्य रुग्णांची ग्राहक म्हणून कोरोनाकाळात लूट झाली.
कोरोनादरम्यान तीन महिने काम बंदच होते. जुलैपासून पुन्हा ग्राहक मंचाचे काम सुरू झाले. मात्र रुग्णालये, औषधांच्या लुटीविरोधात दावे करणारी एखाददुसरी तक्रार वगळता तक्रारी आलेल्या नाहीत.- उमेश चव्हाण, प्रबंधक, ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
अनेक रुग्णालयांविरोधात जास्त बिले घेतल्याच्या तक्रारी होत्या. काहींनी तक्रारी केल्याही नाहीत. मात्र, जिल्ह्यात रुग्णांची जवळपास ६० ते ७० कोटींपर्यंत लूट झालेली आहे. याचे रिऑडिट होण्याची गरज आहे. - गणेश जाेशी, राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक संरक्षण परिषद