ठाणे : दिवा पंचक्रोशीतील शीळ-कल्याण मार्गावरील म्हात्रे वाडीतील ब्रिटिशकालीन मोठा नाला बुजविल्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती उद्भवली होती. रविवारी पहाटे दोन वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. त्यामुळे या भागातील तब्बल अडीचशे कुटुंबांना सुमारे बारा तास पाण्यात राहावे लागले. या नागरिकांवर येणारे हे संकट कायमचे दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने एमएमआरडीए, एमआयडीसी, विपक्ष नेते, स्थानिक नगरसेवकांसह रहिवाशांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.
दिवा प्रभाग समितीअंतर्गत म्हात्रेवाडी ही अडीचशे घराची वसाहत आहे. या भागातील ओढा परिसरातील सर्व सांडपाणी, तसेच पावसाचे पाणी वाहून नेत होता. मात्र, रस्ते बांधकाम प्राधिकरणाने या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करताना येथील मोरी आणि पूर्णपणे ओढाच बुजवून टाकला आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टी झाल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात सुमारे बारा तासांहून अधिक काळ तुंबले होते. या ठिकाणी पठाण यांनी भेट दिली.
रस्ते प्राधिकरणाच्या चुकीमुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथील पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि ही समस्या कायमची निकाली काढावी, अशी मागणी केली आहे.