मीरा रोड : शहरातील रिक्षाचालक रिक्षा चालवताना इअरफोनचा वापर करत असल्याने प्रवाशांनी सांगितलेले ऐकू न येऊन भांडणे झाल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत मोठ्या प्रमाणात येत होत्या. त्यामुळे ठाणे ग्रामीण वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालवताना मोबाइल वापरणाऱ्या अडिचशे चालकांचे इअर फोन जप्त करुन ते पेटवून दिले.इअरफोन अथवा ब्लूटुथने बोलतबोलत वा गाणी ऐकत रिक्षा चालवण्याची स्टाईल मारण्याचे प्रकार शहरात सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कुठे जाण्याचे सांगितलेले ठिकाण, रिक्षा मध्येच थांबवण्यास सांगितली किंवा भाडे आदीवरुन रिक्षा चालकांकडून गोंधळ घातला जात होता. यावरुन प्रवासी व चालकांमध्ये वाद होत होते. शिवाय बेजबाबदारपणे रिक्षा चालवल्याने अपघातांची धास्ती वाढली होती.इअरफोन वा ब्ल्यूटुथ लावल्याने वाहतूक पोलिसांनादेखील रिक्षा चालक मोबाइलवर बोलतोय की गाणी ऐकतोय हे समजत नाही. वाहतूक पोलिसांनी अडवलेच तर मोबाइलवर कुठे बोलतोय असा कांगावा करुन रिक्षाचालक भांडण करण्यास तयार होतात. एकीकडे अशा तक्रारी वाढत असताना, दुसरीकडे रिक्षाचालक मात्र मोबाइलचा वापर करतच होते. त्याअनुषंगाने ठाणे ग्रामीण वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश कड आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारपासून इअरफोन, ब्ल्यूटूथ कानाला लावून रिक्षा चालवणाºया चालकांविरोधात विशेष मोहिमच सुरु केली. त्यानुसार मीरा रोड रेल्वेस्थानकाबाहेरील मुख्य रिक्षा स्थानकासह अन्य प्रमुख ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांचे इअरफोन जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये पहिल्याच दिवशी २५० हून अधिक रिक्षा चालकांचे इअरफोन इअरफोन काढून चौकात त्याची एकत्र होळी केली. पोलिसांच्या या कारवाईने रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. काही चालकांनी या कारवाईवरुन पोलिसांशी हुज्जत घातली. मात्र या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
250 रिक्षा चालकांचे इअरफोन जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:08 AM