कल्याण : कल्याण पश्चिमेतील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण शाखा आणि कल्याण वनविभागानेे छापा टाकून २५० इंद्रजाल (काळे समुद्री शेवाळ) आणि ८० जोडी घोरपडीचे अवयव जप्त केले आहेत. वास्तू सल्लागार गीता जखोटिया, त्यांच्या कार्यालयातील नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत जखोटिया यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात काही दुर्मीळ वस्तू आणि प्राण्यांचे अवयव असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण खात्यास मिळाली. त्याआधारे गुरुवारी उपसंचालक योगेश वरकड, गजेंद्र हिरे आणि वन विभागाचे आर. एन. चन्ने यांच्या पथकाने छापा मारला. या छाप्यात २५० इंद्रजाल आणि ८० जोड्या घरपडीचे अवयव सापडले. इतक्या मोठ्या प्रमाणात या वस्तू वास्तू सल्लागाराकडे कशा काय आल्या याचा तपास सुरू आहे.
काळ्या जादूसाठी हाेताे वापर
इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात कार्यालयात दुकानात ठेवल्यास सुखशांती, आरोग्य आणि लक्ष्मी नांदते या अंधश्रद्धेपोटी वस्तू बाळगल्या जातात. तसेच काळी जादू करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच आयुर्वेदातही त्याचा औषधी वापर केला जातो. त्यामुळे या वस्तू बाळगणे, त्याची विक्री करण्यास वन्य जीव कायद्यान्वये मज्जाव करण्यात आलेला आहे.