- सुरेश लोखंडे
ठाणे : मच्छीमारीसाठीठाणे- पालघर जिल्ह्यातील बंदरांतून ८१७ बोटी गेल्या असता आतापर्यंत ५६१ बोटीं बंदरात परत आलेल्या आहेत. मात्र अध्याप २५६ बोटी अजून किनार्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतिक्षा करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील 'तौकते' चक्रीवादळाच्या दृष्टीने समुद्रातील या बोटींबाबत चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ७८ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरातील १८७ बोटी समुद्रातून आलेल्या नसल्याने चिंता वाढली आहे. ठाणेच्या उत्तन बदरातून ३०५ बोटी समुद्रात गेलेल्या असता २२७ परत आलेल्या आहेत. सातपाटी, एडवन, डहाणू , वसईच्या बंदरात ३३४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. मात्र १७८ बोटींची वाट पाहिली जात आहे.
अरबी समुद्रातील 'तौत्के' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी समुद्र किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली आहे. विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्यासाठी सतर्क दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमुद्र व खाडी किनारा, उत्तन बंदर विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील किनार पट्टीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनास आपत्ती नियंत्र व मदत कार्य कक्ष सतर्क आहे.
मनुष्यबळ, आवश्यक साधन सामुग्री तयार ठेवण्यासाठी तजवीस ठाणे, पालघरमध्ये होत आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून पूर्वतयारी हाती घेतली जात आहे. आजपासून १७ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्यापासून ठाणे, पालघर जिल्ह्यास फारसा फटका बसणार नसला तरी सावधानता बाळगली जात आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना किनार्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमार्यांना आवाहन करण्यात येत आहे.
मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २२७ बोटी बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ७८ बोटींची वाट पाहिली जात आहे. पालघरघ्या डहाणू बंदरातून गेलेल्या ७७ बोटींपैकी ७१ बंदरात आल्या आहेत. उर्वरित सहा बोटी समुद्रात आहे.सातपाटी बंदराच्या ३४ पैकी केवळ आठ बोटी परतल्या आहेत. तब्बल २६ बोटी समुद्रात आहे. याशिवाय वसई बदरातून ४०१ बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या आहेत.यातून २५५ बोटी बंदरात आल्या आहेत. उर्वरित १४६ बोटी समुद्रात आहेत.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळमहाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या तौत्के चक्रीवादळाने आता मोठ्या प्रमाणात वेग पकडल्याची माहिती हवामान खात्यानं सांगितली आहे. तसेच हे चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे.