उल्हासनगर :कोणार्क बँकेच्या सीईओसह बनावट खातेदारांची चौकशी पोलिसांनी सुरू केली. २५ कोटी ६० लाखाची रक्कम गेली कुठे? असा प्रश्न पोलिसांना पडला असून यात मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील सपना गार्डन येथे कोणार्क बँक आहे. सीईओ रमेश माखिजा यांच्यासह इतरांवर २५ कोटी ६० लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात निर्मल भाटिया यांच्या तक्रारीवरून दाखल झाला. भाटिया यांनी सतीश हर्षलानी व महेश हर्षलानी यांना ६ कोटीच्या ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसाठी मालमत्तेची मूळ कागदपत्रे कोणार्क बँकेमार्फत भारत सहकारी बँकेला दिली. दरम्यान, हर्षलानी बंधूंनी ६ कोटीचा भरणा केल्यानंतर भाटिया यांनी कोणार्क बँकेकडे मूळ कागदपत्राची मागणी केली. मात्र ती कागदपत्र देण्यास बँॅकेने टाळाटाळ केल्याने, संशयाची पाल त्यांच्या मनात चूकचूकली.भाटिया यांच्या मालमत्तेच्या मूळ कागदपत्रावरून बनावट कागदपत्र तयार केली, स्टॅम्प व सहया यावर वेगवेगळया नावाने १६ कंपन्यांचे खाते उघडले. या खात्यातून वर्किंग कॅपिटल ओव्हरड्राफ्ट सुविधेद्बारे १६ बनावट कंपन्यांच्या खात्यात कर्ज रूपाने जमा झालेली २५ कोटी ६० लाखाची रक्कम सीईओ माखिजा व इतरांनी काढून घेतल्याचा प्रकार उघडझाला.भाटिया यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली. हा प्रकार ५ मार्च २०१५ पासून सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मध्यवर्ती पोलिसांनी भाटिया यांच्यासह संबंधित बँक कर्मचारी व बनावट खातेदारांची चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी दिली.दरम्यान, या प्रकरणी योग्य प्रकारे चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी भाटिया यांनी केली आहे. मोठे मासे गळाला खरोखरच लागतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोणार्क बँकेत २६ कोटींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:47 AM