कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली २७ गावे वगळण्याच्या मागणीकरिता येत्या २६ आॅक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. या उपोषणात २७ गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वपक्षीय संघर्ष समितीने केले आहे. आशेळे गावातील शिवलीला लेवा पाटीदार सभागृहात २७ गावे संघर्ष समितीची सभा शुक्रवारी पार पडली. या वेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी अर्जुनबुवा चौधरी, बळीराम तरे, चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आदी मान्यवर उपस्थित होते.२७ गावांतील रस्ते विकास हा गावांसाठी केला जात नसून बिल्डरांसाठी केला जात आहे, असाही आरोप या वेळी समितीने केला.२७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय १ जून २०१५ रोजी राज्य सरकारने घेतला. त्यानंतर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची जाहीर सभा घेतली. त्या वेळी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याकरिता संघर्ष समितीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्यावर राज्य सरकारने अद्याप प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.ही गावे वगळण्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी केली गेली.
२६ आॅक्टोबरला लाक्षणिक उपोषण
By admin | Published: October 15, 2016 6:45 AM