अंबरनाथ : दुचाकी चोरून त्या इतरांना विकणाऱ्या त्रिकुटाला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ५ लाख ८२ हजार किमतीच्या २६ दुचाक्या जप्त केल्या असून त्यांच्या चौकशीतून दुचाकीचोरीची आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्र्तवण्यात येत आहे. अंबरनाथ पोलिसांनी नुकतेच अमोल साळुंखे, अजय अधिकारी व दिनेश भोईर या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून २६ दुचाक्या जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दिनेश भिवंडीचा, तर उर्वरित दोघे शहापूरला राहणारे आहेत. मूळचा शहापूरचा रहिवासी असलेला अमोल अंबरनाथच्या वांद्रापाडा भागात भाड्याने राहत असून तो व त्याचे साथीदार दुचाकी चोरून इतरांना विकत असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल शिरीष पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, वासिंद, शहापूर, आटगाव, टिटवाळा येथून दुचाक्या चोरल्याचे कबूल केले. तसेच अजय अधिकारी व दिनेश भोईर यांच्या मदतीने नंबरप्लेट बदलून व इतर फेरफार करून त्या इतरांना विकल्याचे सांगितले. अमोल व त्याच्या साथीदारांनी आणखीही काही दुचाक्या चोरून इतरांना विकल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस याबाबत सखोल तपास करणार आहेत.पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज, सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार घोरपडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश धुमाळ, अजय म्हेत्रे, काशिनाथ कौटे, पोलीस हवालदार दिलीप जाधव, सुभाष ससाणे, सतीश चौधरी, गणेश राठोड, शिरीष पाटील, हेमंत पाटील, गणेश मोरे, म्हातारदेव डोळे, शरीफ तडवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
२६ दुचाक्यांसह त्रिकुटाला केली अटक
By admin | Published: January 23, 2017 5:24 AM