ठाणे : शहरात निर्माण होणाऱ्या विविध स्वरुपाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प ठाणे महापालिका आयुक्तांनी हाती घेतले आहेत. त्यानुसार हरित कचऱ्यापासून आतापर्यंत २६० टन जळाऊ इंधनाची निर्मिती केली असून त्याचा पुरवठा येत्या १ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बॉयलरसाठी करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबवण्यापूर्वी महापालिकेला बॉयलरसाठी इंधन विकत घ्यावे लागत होते. यासाठी एका टनासाठी प्रतिदिन ८ हजार रु पये खर्च येत होता. परंतु, आता समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने राबवलेल्या या प्रकल्पामुळे शहरातील हरित कचऱ्याचा प्रश्न निकालात निघून इंधन खरेदीचा खर्चदेखील वाचला आहे. भविष्यात ठाण्यातील काही कंपन्यांनादेखील या इंधनाचा पुरवठा करण्याचा महापालिकेचा मानस आहे. प्लास्टीकपासून इंधन निर्मिती करण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला असतांनाच आता यापुढेही जाऊन शहरात प्रतीदिन निर्माण होणाऱ्या ५० टनाहून अधिक हरित कचरा एकित्रत करु न त्यापासून जळावू इंधन तयार करण्याचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठाने कार्यान्वित केला आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे. वृक्ष, झाडाच्या फांद्या, पाने, गवत असा मोठ्याप्रमाणात हरित कचरा शहरात निर्माण होत असून सध्या या कचऱ्याची तीन पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यामध्ये एक तर हा कचरा क्षेपणभूमीवर टाकला जातो, गृहसंकुलात तो जाळला जातो किंवा अडगळीच्या ठिकाणी टाकला जात आहे. परंतु, शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने तसेच हा कचरा जाळल्याने हवा प्रदूषित होऊन दुर्गंधी पसरत आहे. कचरा फेकून दिल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळचे त्याच्या व्यवस्थापनासाठी हरित कचऱ्यापासून जळाऊ इंधन हा महत्त्वकांक्षी प्रकल्प एप्रिल २०१६ ला सुरु केला. कोपरी येथील मलिन:सारण केंद्रावरील निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
हरित कचऱ्यापासून २६० टन जळाऊ इंधनाची निर्मिती
By admin | Published: March 15, 2017 2:25 AM