कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांत ६० टक्के पाणीकपात लागू झाली आहे. असे असतानाही या गावांत महापालिका पाण्याचे टँकर पुरवत नाही. इतकेच काय, तर बोअरवेल्सची दुरुस्ती आणि विहिरींच्या स्वच्छतेकडेही प्रशासन लक्ष देत नाही, अशी ओरड स्थायी समिती सदस्यांनी गुरुवारी सभेत केली. विशेष म्हणजे महापालिकेने आपत्कालीन पाणीटंचाईच्या आराखड्याची अंमलबजावणीही अजून केलेली नाही, असे सदस्यांनी सांगितले. या प्रकरणी सभापतींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नव्हते. दरम्यान, उपायुक्त दीपक पाटील शुक्रवारी २७ गावांत पाहणी करून पाणीटंचाईचा आढावा घेतील, असे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले.प्रभाग क्रमांक ११३ मधील शिवसेनेच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे, भाजपा नगरसेवक रमाकांत पाटील आणि हर्षली थविल यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेच्या अन्य हद्दीपेक्षा २७ गावांत पाणीकपात जास्त आहे. धरणात पाणी नसल्याने कपात लागू असल्याचे सदस्यांनी मान्य केले. मात्र, एमआयडीसीकडून ६० टक्के कपात लागू झाली आहे. यापूर्वी हीकपात ३५ टक्के होती. त्यामुळे गावांतील पाण्याची स्थिती बिकट आहे. गावातील बोअरवेल्सची दुरुस्ती होत नाही. टँकर मागवूनही पालिका ते पुरवत नाही, अशी व्यथा म्हात्रे यांनी मांडली. गाव परिसरातील इमारतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वस्तीला पाणी दिले जात नाही. हा दुजाभाव आहे. पाण्याचे नियोजन केले जात नाही. सदस्यांनी तक्रारी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही, असे पाटील म्हणाले. अधिकारीही गावांत फिरकत नाहीत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा हे सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप सदस्यांनी केला. या मुद्द्यांवरून सभापती संदीप गायकर यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापालिकेने गावांसाठी आपत्कालीन पाणीटंचाईकृती आराखडा तातडीने मंजूर केला आहे. त्यासाठी २५ कोटींचा निधीही देऊ केला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही, असे सदस्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाणीटंचाईचा कृती आराखडा कागदावरचपाणीटंचाईच्या कृती आराखड्यात बोअरवेल्स खोदणे, नादुरुस्त बोअरवेल्सची दुरुस्ती, विहिरींची स्वच्छता, पाणी साठवण्यासाठी टाक्या बसवणे, आदी कामांचा समावेश आहे. मात्र, ही कामे अजून सुरू झालेली नाहीत. ‘त्या’ दिवशीही टँकर बंदमहापालिकेने पाणीपुरवठ्याचे कंत्राट खाजगी कंत्राटदाराला दिले आहे. महापालिकेने या टँकरद्वारे ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करायचा आहे. एका टँकरपोटी महापालिका २ हजार ३९० रुपये कंत्राटदाराला मोजते. महापालिकेकडे १५ टँकर होते. त्यात, आणखी दोनची भर पडली आहे. ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद असतो, त्या दिवशी टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही.पाणीबिलाच्या वसुलीची सक्ती अयोग्यमहापालिका नागरिकांना पाणी देत नसेल, तर टंचाईच्या काळात पाणीबिल वसुलीसाठी सक्ती करणे योग्य नाही. पावसाळ्याश्चात पाणीबिल वसुलीची सक्ती करावी, असे सभापती गायकर यांनी प्रशासनाला सूचित केले आहे.
२७ गावांत पुन्हा पाणी पेटले
By admin | Published: March 11, 2016 2:30 AM