लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्याने ठेकेदाराच्या बस दाखल झाल्याने, परिवहनच्या हक्काच्या बस मात्र रस्त्यावर उतरणे बंद झाले आहे. वागळे आणि कळवा आगारातून आजघडीला केवळ १५४ बस रस्त्यावर धावत आहेत. त्यात २७ बस या किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली धूळखात पडल्याचेही परिवहनने स्पष्ट केले आहे. ठाणे परिवहनचा गाडा सुधारण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्यापही तो काही केल्या रुळावर आलेला नाही. मागील काही महिन्यांपासून परिवहनच्या ताफ्यात ठेकेदाराच्या बस दाखल झाल्याने ठाणेकर प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु,एकीकडे ठेकेदाराच्या बस रस्त्यावर धावत असतांना परिवहनच्या ताफ्यातील ३१७ पैकी केवळ १५४ बसच रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. वागळे आगारातून ९८, कळवा - २८ आणि निलकंठ येथून एसी बसेस २८ अशी ही संख्या आहे. अधिक उत्पन्न देणारे मार्ग ठेकेदाराने आपल्याकडे घेतल्याने बस कोणत्या मार्गावर सोडायच्या असा उलटा प्रश्न सवाल परिवहनकडून पालिका प्रशानाला केला जात आहे. या कारणामुळे मागील कित्येक महिन्यांपासून २७ बसेस या वागळे आगारात केवळ किरकोळ दुरुस्तीसाठी धूळखात पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दुरुस्तीसाठी आवश्यक ती पावले उचलली असून चार ते पाच दिवसात त्या रस्त्यावर धावतील असा विश्वास व्यक्त केला. तीन एसी बसचीही दुरुस्ती झाल्याने त्या रस्त्यावर धावतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
किरकोळ कारणासाठी २७ बस धूळखात
By admin | Published: May 24, 2017 1:08 AM