कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांना ५० टक्के सबसिडी देऊन महापालिकेच्या दरानुसार पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. पाणीपुरवठा करणा-या एमआयडीसीशी पत्रव्यवहार करण्यात आला असून महापालिकेचे दर लागू करण्यासंदर्भात लवकरच एमआयडीसीचे अधिकारी, आयुक्त आणि महापौर यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी महासभेला दिली.केडीएमसी क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या २७ गावांचा गेल्या वर्षी १ जूनला पालिकेत समावेश करण्यात आला. परंतु अजूनही तेथे एमआयडीसी पाणीपुरवठा करते. त्यांचे दर जादा असल्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना महापालिकेच्या म्हणजे सात रूपये दराने पाणीपुरवठा करण्याची मागणी २७ गावांमधील सदस्यांनी महासभेत केली. गावांना सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्याप्रमाणे याचीही अंमलबजावणी व्हावी, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.२७ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे एमआयडीसीने पुरवठा वाढवुन दिल्यास अथवा त्यांच्याच माध्यमातून पाणी मिळाले, तरच गावांना महापालिका पाणी देऊ शकते, हा मुद्दाही यावेळी उपस्थित झाला. एमआयडीसीकडून गावांसाठी ५० एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून निवासी भागासह कंपन्या, मोठी गृहसंकुले आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीचे पाणी वापरून महापालिका दराने द्यायचे असेल तर त्यांना ५० टक्के सबसिडी द्यावी लागेल. त्या अनुषंगाने आगामी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी लागेल. (प्रतिनिधी)
२७ गावांचे पाणी झाले स्वस्त!
By admin | Published: January 20, 2016 1:56 AM