कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीप्रश्न सुटत नसल्याने येत्या सोमवारी या गावांतील नगरसेवक महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करणार आहेत, असा इशारा बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपा पुरस्कृत अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील व नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी दिला आहे.प्रभाग क्रमांक १०८ आडिवली-ढोकाळीचे नगरसेवक पाटील म्हणाले, ‘माझ्या प्रभागातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी ४३ लाख रुपये खर्चून जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रशासनाने मंजुरी दिली. मात्र, माशी कुठे शिंकली, काही कळत नाही. या कामाचा कार्यादेश अजून दिलेला नाही. २७ गावांसाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेंतर्गत १८० कोटींची पाणीपुरवठा योजनाही निविदा मंजुरीच्या गर्तेत आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावर २७ गावांतील नगरसेवक एकत्र येऊन उपोषण करणार आहेत.’नगरसेविका म्हात्रे म्हणाल्या, ‘पी अॅण्ड टी कॉलनीतील पाणीसमस्या अडीच वर्षांपासून सुटलेली नाही. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही पाणी मिळत नाही. अन्यथा, सोमवारी उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल.’त्यावर २७ गावांतील पाणीप्रश्नी उपोषण करू नका, असे आवाहन सभापती राहुल दामले यांनी केले. आपण समितीचे सदस्य आहात. या ठिकाणी चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दिले.शिवसेना नगरसेविका छाया वाघमारे म्हणाल्या, ‘बिर्ला कॉलेज परिसरातील माझ्या प्रभागात अडीच वर्षांपासून पाणी कमी दाबाने येते. त्यामुळे नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो. कमी दाबाची समस्या सोडवण्यासाठी आठ इंच व्यासाची नवी जलवाहिनी टाकण्यात आली. तरीही, कमी दाबानेच पाणी येत आहे. याविषयी विचारणा केली असता महापालिकेच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत. शेजारीच महापौरांचा प्रभाग आहे.मात्र, तेथे कमी दाबाने पाणी येत नाही. तेथेही मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातूनच पाणीपुरवठा होतो.मग, माझ्या प्रभागातच पाणी कमी दाबाने का येते, असा सवाल त्यांनी केला.१३ एप्रिलला उघडणार निविदापाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक म्हणाले, २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी मागवलेली पहिली निविदा सरकारने रद्द केली. त्यानंतर, पुन्हा निविदा मागवली असून त्यासाठी तीन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी कमी दराच्या निविदाधारकांसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चर्चा करून कार्यादेश देण्यात येईल.दरम्यानच्या काळात २७ गावांतील प्रत्येक प्रभागासाठी २० ते २५ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठ्याची कामे मंजूर केली आहेत. एकूण पाच कोटी ५० लाख रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवल्या, तेव्हा पहिल्या निविदेला प्रतिसाद आला नव्हता. आता पुन्हा फेरनिविदा प्रत्येक कामासाठी स्वतंत्ररीत्या मागवल्या आहेत. त्या १३ एप्रिलला उघडण्यात येणार आहेत. वाघमारे यांच्या प्रभागातील कमी दाबाने येणाऱ्या पाणीसमस्येचीपाहणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता मी स्वत: भेट देणार आहे.
२७ गावांचा प्रश्न : पाणीटंचाईविरोधात सोमवारी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:31 AM