ठाणे: महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याच्या हेतूने इंदापूर खेड्यातून ठाण्यात आलेल्या पोलीस शिपाई महेश मोरे यांचा आकस्मित मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजता साकेत मैदानावर महेश मोरे आपल्या सहकार्यांसह व्यायाम करण्यासाठी गेले होते. याच वेळी व्यायाम करता करता मोरे जमिनीवर कोसळले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले. एका २७ वर्षीय पोलीस शिपायाची अचानक जाण्याने ठाणे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ठाणे पोलीसमधील शीघ्र कृती दलातील पोलीस कर्मचारी व्यायाम करण्यासाठी दररोज सकाळी ६ वाजता जात असतात, याच वेळी पोलीस शिपाई महेश मोरे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी पोहचले होते. व्यायाम करताना मोरे जमिनीवर कोसळले आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याआधी त्याची प्राणज्योत मावळली.
शिपाई महेश मोरे यांची पत्नी ठाणे वाहतूक विभागात शिपाई म्हणून कार्यरत असून मोरे यांना २ वर्षेचा मुलगा आहे. दरम्यान झालेल्या या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मोरे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याचा उलगडा होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.