ठाणे - एकीकडे ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांचा मेकओव्हर करण्याचे निश्चित केले असतांना आता महापालिका शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थीसुध्दा आता वेगळ्या रंगसंगतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी सज्ज होणार आहेत. त्यानुसार महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीं आता आकर्षक गणवेशात दिसणार असून येत्या १० दिवसात या विद्यार्थ्यांच्या हात इंग्रजी माध्यमातील शाळांप्रमाणे हटके गणवेश मिळणार आहे. या गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आखल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी हायटेक शिक्षण देण्यासाठीसुध्दा प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यांच्या अंगावर असणारे गणवेश हे फारसे चांगले नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यानंतर आता एका खाजगी बँकेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे हे गणवेश बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार इंग्रजी माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांचे जसे गणवेश असतात, त्याच धर्तीवर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहेत. त्यानुसार महापालिका शाळांमधील २८ हजार विद्यार्थ्यांचे जुने गणवेश आता डिसेंबरमध्येच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पूर्वी प्रमाणेच १६ कोटींचा खर्च होणार आहे. परंतु यातून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश उपलब्ध होणार असल्याचा दावा शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी केला आहे. हे नवीन गणवेष विद्यार्थ्यांना स्वत:च विकत घ्यायचे असून त्याचे पैसे मात्र विद्यार्थ्यांच्या बँकेतील खात्यात वर्ग केले जाणार आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात सुमारे साडे पाच हजार जमा होणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेचे दोन गणवेश प्रत्येकी एक - एक पीटी आणि खेळाचा गणवेष विकत घ्यावा लागणार आहे. त्याव्यतिरिक्त शाळेचे आणि खेळाचे असे प्रत्येकी एक - एक बूट ही विकत घ्यावे लागणार आहे. यासाठी महापालिकेने काही ठराविक दुकानदार ठरवले आहेत त्यांच्याकडे हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. महापालिका शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरता पालक अनेक वेळा इच्छूक नसतात त्यांचा कल हा खाजगी शाळांकडे अधिक असतो परिणामी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत होती याकडे गांभीर्याने पाहत आता या शाळांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याची सुरवात आता नवीन गणवेशापासून झाली आहे.येत्या दोन महिन्याच्या कालावधीत ठाणे महापालिकेच्या शाळामधील २०० वर्गांमध्ये फळया ऐवजी आता ५५ इंचचा टचस्क्रीनचा एलईडी बसवण्यात येणार आहे. याशिवाय साध्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी खास अॅपही तयार करण्यात येत आहे. यांत तब्बल ३५० शिक्षकांना डिजीटल फळा कसा हाताळावा यापासून ते संकल्पांच्या माध्यमातून सहज सोप्या पद्धतीने कसे शिकवावे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक इयत्ता व वर्गासाठी डिजीटल कीट तयार करण्यात आला आहे.
महापालिका शाळांमधील २८ हजार विद्यार्थीही दिसणार आता आर्कषण गणवेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 4:37 PM
इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांसारखेच आता महापालिका शाळांमधील विद्यार्थीही दिसणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता आर्कषक गणवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार येत्या १० दिवसात विद्यार्थ्यांच्या हाती नवीन गणवेश पडणार आहेत.
ठळक मुद्देवर्गामध्ये लागणार डिजीटल फळेगणवेशाची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात होणार जमा