ठाणे - डोंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी (3 जुलै) महिलेची वन रूपी क्लिनिकमध्ये प्रसुती झाली आहे. जस्मिन शब्बीर शेख असं महिलेचं नाव असून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसूती वेदना होण्यास सुरुवात झाल्यावर खडवली येथून लोकलने मुंबई प्रसूतीसाठी निघालेल्या 29 वर्षीय जस्मिन यांची डोंबिवली स्थानकात बुधवारी सकाळच्या सुमारास प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. मायलेक सुखरूप असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जस्मिन शब्बीर शेख असे त्या महिलेचे नाव असून त्या 9 महिन्यांच्या गरोदर होत्या. सकाळी त्या नातेवाइकांसोबत मुंबईतील कामा रुग्णालयात जात होत्या. खडवली येथून लोकल डोंबिवलीत येत असताना, त्यांना प्रसूतीच्या वेदना जास्त होऊ लागल्याने डोंबिवलीत फलाट क्रमांक 3 येथे उतरवले. तेथेच तिची प्रसूती प्रवासी महिलांसह रेल्वे पोलिसांनी नॉर्मल पध्दतीने केली. त्यानंतर, त्या मायलेकांना फलाट क्रमांक 1 वरील वन रूपी क्लिनिकमध्ये आणले, त्यावेळी तेथील डॉ अक्षय यांनी उपचार करत तेथून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती डॉ राहुल घुले यांनी दिली आहे.