पंकज रोडेकरठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत एचआयव्हीसह जीवन जगताना स्वत:हून उपचारापासून २०१४ पासून ७४९ जण लांब राहत होते. त्यांना पुन्हा उपचाराच्या प्रवाहात आणण्यासाठी राबवलेल्या शोधमोहिमेत २९५ जणांना पुन्हा उपचाराच्या प्रवाहात आणण्यात ठाणे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाला यश आले आहे.
या मोहिमेत १२७ जण स्थलांतरित, तर ६५ जण दगावल्याचीही माहिती पुढे आली आहे. तसेच ११३ अद्यापही संपर्कात आलेले नाही. तर, ६१ जणांनी चुकीची माहिती दिली होती. त्याचबरोबर, ६८ जण अजूनही उपचाराच्या प्रवाहात येण्यासाठी नकारघंटा वाजवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे संचालक परिमल सिंग (आयएएस) यांच्याही बाब लक्षात येताच त्यांनी १ जुलै ते ३१ आॅक्टोबरदरम्यान ‘मॉप अॅप कॅम्पेन’ ही जनजागृती मोहीम हाती घेतली. त्यानुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ५५९, पालघर जिल्ह्यातील एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या १९० जणांचा या मोहिमेंतर्गत शोध सुरू झाला. चार महिन्यांत राबवलेल्या शोधमोहिमेत दोन्ही जिल्ह्यांतील २९५ जणांना पुन्हा प्रवाहात आणून उपचार सुरू केले आहेत. त्यामध्ये ठाण्यातील २१६, तर पालघरमधील ७९ जणांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.ठाणे-पालघरमधील रुग्णच्ठाणे जिल्ह्यातील एकूण ५५९ रुग्ण उपचारापासून दूर होते. त्यातील २१६ रुग्ण पुन्हा प्रवाहात आले आहेत. तर, ४१ जणांचा मृत्यू झाला. ८९ जण स्थलांतरित झाले असून ५० जणांनी उपचारासाठी नकारघंटा वाजवली आहे. ५८ जणांनी चुकीची माहिती दिली. ७५ जणांचा संपर्कच नाही.च्पालघरमधील १९० पैकी ७९ जण पुन्हा उपचाराच्या प्रवाहात आले असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे. ३८ जणांनी स्थलांतर केले असून १८ जणांनी उपचार घेणार नसल्याचे म्हटले आहे. २८ जण संपर्कात नाहीत, तर तीन जणांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचा शोध लागलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘मॉप अॅप कॅम्पेन’ मोहिमेद्वारे एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना शोधून आणण्यासाठी जिल्ह्यातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करून अनेक व्यक्तींना एआरटी केंद्रापर्यंत आणून पुन्हा उपचार सुरू केले आहेत. यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यांच्यासोबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा सामान्य रु ग्णालय, ठाणेजिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींपैकी ९८ टक्के व्यक्तींवर एआरटी केंद्रात उपचार सुरू असून ज्या व्यक्ती सामाजिक कलंक आणि भेदभावामुळे उपचारापासून दूर आहेत, त्यांचे समुपदेशन सुरू केले आहे. - डॉ. रतन गाढवे, जिल्हा कार्यक्र म अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, ठाणे व पालघर