कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू असून, आठ दिवसांत २९५ शाळाबाह्य विद्यार्थी सापडले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समावून घेतले जाणार आहे.
मनपाच्या स्थायी समिती दालनात मंगळवारी या संदर्भात शिक्षण विभागाची बैठक झाली. या वेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिक्षण विभागाचे उपायुक्त अनंत कदम, शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी, शिक्षण विभागाच्या अर्चना जाधव आदी उपस्थित होते.
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण १ मार्चपासून सुरू असून, त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ८ मार्चपर्यंत २९५ शाळाबाह्य मुले आढळली आहेत. बुधवारपर्यंत सर्वेक्षणाचे काम चालणार असून, त्यामुळे ही संख्या वाढूही शकते, असा दावा मनपाच्या शिक्षण विभागाने केला आहे. शाळबाह्य मुलांना तातडीने नजीकच्या शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया प्रशासनातर्फे पार पाडण्यात आली आहे.
केडीएमसी हद्दीत १०० पेक्षा जस्त गृहसंकुलांचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांवर काम करणारे बहुतांश कामगार कोरोनाकाळात त्यांच्या मूळ गावी परतले होते. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी कमी आढळले आहेत. मात्र अनलॉकनंतर काही मजूर पुन्हा शहराकडे कामकाजाकरिता परतले. आठ दिवसांच्या सर्वेक्षणातून ४८ मुले परप्रांतात स्थलांतरित झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या हाती आली आहे. तर, २९५ पैकी ८३ मुले ही परप्रांतातून पुन्हा कल्याण-डोंबिवलीत स्थलांतरित झाल्याचे आढळून आले आहे.
सध्या कोरोनामुळे शाळा सुरू झालेल्या नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. त्यापैकी केवळ ५० टक्केच विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांकडे इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट नसल्याने त्यांना दूरदर्शनचा आधार घ्यावा लागत आहे. सह्याद्री वाहिनीवरून त्यांना टिली मिली कार्यक्रमातून शिक्षण दिले जात आहे. तसेच काही शिक्षक त्यांच्या घरी जाऊन त्यांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
---------------