- प्रशांत माने
कल्याण : आपल्या गाडीपेक्षा तिचा नंबर दुसऱ्यांचे लक्ष कसे वेधून घेईल, याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. आपल्या वाहनाला आवडीचा क्रमांक मिळावा, यासाठी ते इच्छुक असतात. नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा अनेकांचा समज असतो. त्यासाठी अधिकचे पैसे मोजण्यास तयार होतात. अलीकडच्या काळात ही क्रेझ वाढत चालली आहे. अशा चॉइस नंबरच्या माध्यमातून कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) वर्षभरात तब्बल २९ कोटी ६२ लाख ५३ हजारांचा महसूल मिळाला आहे.
कल्याण आरटीओ परिक्षेत्रात दिवा, कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, मुरबाड परिसर येतो. या भागातील ३४ हजार ३६० जणांनी चॉइस नंबरसाठी अर्ज केले होते. वाहनांना आकर्षक नंबर देण्याचे फॅड नवे नाही. गाडीला ठरावीक नंबर मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
तीन किंवा चारही आकडे सारखे असतील, अशा क्रमांकाला सर्वाधिक पसंती असते. आरटीओ कार्यालयाकडून नियमित शुल्क घेऊन वाहन क्रमांक दिला जातो. कोणत्या क्रमांकासाठी किती पैसे लागतात हे आधीच ठरविण्यात आलेले असते. हौशी लोक आपल्याला अपेक्षित असलेला वाहन क्रमांक मिळावा, यासाठी लाखो रुपयेही मोजतात.
सर्वाधिक पसंती कोणत्या नंबर्सला?
राज्य परिवहन विभागाकडून प्रत्येक सिरीजमध्ये ०००१ आणि ९९९९ दरम्यान अनेक नंबर्सना व्हीआयपी नंबर्स म्हणून चिन्हांकित केले जाते. हे नंबर्स सामान्य नोंदणी प्रक्रियेद्वारे मिळत नाहीत. परिवहन विभाग सर्व उपलब्ध व्हीआयपी नंबर्सची यादी जाहीर करते.
१ हा क्रमांक घेण्यासाठी वाहनचालकांची धडपड सुरू असते. ९ हा आकडा भाग्यशाली असल्याचा काहींचा समज आहे. त्यामुळे आपल्या वाहन क्रमांकाच्या आकड्यांची बेरीज ९ येईल, असा क्रमांक निवडत असल्याचे दिसून येते. तीन आणि चारही आकडे सारखे असतील तर त्या नंबरलादेखील सर्वाधिक पसंती मिळते.