ठाणे : राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभागाच्या फ्लाईंग स्कॉर्डने मागील वर्षभरात विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात दोन कोटी २९ लाखांचा मद्यसाठ्यांचा समावेश आहे, तर ३१८ जणांना अटक करून ५४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे
महाराष्ट्रत अनेकवेळा परराज्यातील मद्य चोरून आणले जाते. यात विशेष करून गोवा व दीव दमन येथील दारूचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. ते खासगी बसेसच्या माध्यमातून चोरून आणले जाते. त्यामुळे गुजरात, गोवा आदी राज्यांतून येणाऱ्या अशा बसवर या फ्लाईंग स्कॉर्डची विशेष नजर असते. महत्त्वाची बाब म्हणजे अनेकवेळा गावठी आणि हातभट्टीच्या दारूची विक्री करताना विविध मार्ग अवलंबिले जातात. यात दुधाच्या किटलीत वर दूध आणि खाली पिशवीत दारू ठेवून विक्री होते.काहीवेळा लॅपटॉपच्या बॅग मधूनही तिची ने -ण केली जाते. काहीवेळा तर खाडीत आतमध्ये खारफुटीच्या जंगलात हातभट्टीची दारू तयार केली जाते. तेव्हा बोटीतून प्रवास करून या हातभट्ट्यांवर कारवाई केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभाग आयुक्त कांतिलाल उमप, संचालक वर्मा, उपायुक्त सुनील चव्हाण, अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे फ्लाईंग स्कॉडचे निरीक्षक सुनील कणसे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक संजय पुरळकर, विजय धुमाळ, जवान बोडरे, जानकर, कापडे-पाटील यांच्या पथकाने ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली आदी पट्ट्यात ही कारवाई केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात ठाणे फ्लाईंग स्कॉर्डने एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत या पथकाने आठ लाख ४६ हजार ५९५ लिटर रसायन, १८ हजार ४५५ लिटर हातभट्टीची दारू, देशी मद्य एक हजार ६८५ लिटर, विदेशी मद्य २३६ लिटर ,२९३ लिटर बिअर , सातशे लिटर ताडी, एक हजार ९१५ किलो काळा गूळ, ९५ किलो नवसागर कारवाई करून जप्त केला आहे. यात २९७ वारस गुन्हे, तर २५१ बेवारस गुन्हे दाखल आहेत. तर ३१८ जणांना अटक करून ५९ वाहने जप्त केली आहेत. त्याची किंमत ७० लाख ५९ हजार इतकी आहे, तर दोन कोटी २९ लाख आठ हजार १६५ रुपयांचे अवैध मद्य असा एकूण दोन कोटी ९९ लाख ६८ हजार ६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.