कल्याण : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शनी मंदिर परिसरात गुरुवारी दुपारी २ वाजता नाशिककडून पिंपळगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या अपघातात कल्याणमधील रहिवासी मयूरी चौरे (१८) हिचा घटनास्थळीच, तर तिची आई वैशाली (४१) आणि भाऊ सागर (२२) या दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयूरीचे वडील पंडित चौरे (४७) आणि चालक संजय बागुल (४२) हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण पूर्वेतील विजयनगर, आमराई परिसरातील बालाजी आर्केड सोसायटीत राहणारे चौरे कुटुंब जळगावला लग्नासाठी कारने चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला. आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्याजवळ सिमेंटच्या गोण्या भरलेला ट्रक बिघडल्याने रस्त्यात बंद पडला होता. दरम्यान, चौरे कुटुंबीयांना घेऊन कल्याणहून जळगावकडे निघालेले कारचालक बागूल यांना उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. कार थेट उभ्या ट्रकला घासून बाजूला जाताच पाठीमागून आलेल्या भरधाव बसची त्या कारला जोरदार धडक बसली. यात कार थेट बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटली. या भीषण अपघातात कारमधील मयूरी हिचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वैशाली यांचा गुरुवारी रात्री उशिरा तर सागरचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेची नोंद तेथील पिंपळगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
‘तो’ व्हीडिओ ठरला अखेरचा- अपघातात जखमी झालेले पंडित चौरे हे मुंबईतील पोलीस दलात कार्यरत आहेत. कारचालक बागुल हेही पोलीस कर्मचारी असून ते कल्याणमध्ये कार्यरत आहेत. मयूरी ही डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होती तर, सागर हा कळव्यातील एका खासगी कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत होता.- आत्तेभावाच्या लग्नासाठी जात असलेल्या मयूरी आणि सागरने प्रवासाचा एक व्हीडिओही काढून मित्र-मैत्रिणींना पाठवला होता; परंतु लग्नस्थळी पोहोचण्यापूर्वीच कुटुंबातील तिघांवर नियतीने घाला घातल्याने त्यांनी काढलेला व्हीडिओ अखेरचा ठरला.