ठाणे : विवाहित मुलीच्या अनैतिक संबंधांमुळे समाजात झालेली बदनामी सहन न झाल्याने वडील आणि तीन भावांनी मिळून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. कल्याण ेस्थानकाजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह २ जानेवारीला आढळला होता. पोलीस तपासात तिच्या हत्येचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. चारही आरोपी उत्तर प्रदेशचे असून कोळसेवाडी पोलिसांनी त्यांना सोमवारी अटक केली.तपासात पोलिसांना तिच्या स्वेटरमध्ये एक सीमकार्ड मिळाले. त्यावरून तिचे नाव मनिता यादव असल्याचे समजले. पोलिसांनी कल्याण रेल्वेस्थानकाचे सीसीटीव्ही तपासले असता ३१ डिसेंबर २०१८ रोजी ती दोन जणांसोबत कामायनी एक्स्प्रेसमधून उतरताना दिसली. चौकशीत ती उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यातील मोरणापूर येथील असल्याचे समजले. त्यानंतर, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता सत्य उघड झाले.मनिताचे सासर गोविंदपूर येथे होते. लग्नानंतर तिचे अनैतिक संबंध सासरच्यांनी रंगेहाथ पकडले. तिला पोलिसांच्या हवाली केले. मनिताच्या अनैतिक संबंधांबाबत मोरणापूरमध्ये कळले. त्यामुळे समाजात झालेली बदनामी कुटुंबीयांना सहन न झाल्याने तिला कायमचे संपवण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. वासिंदच्या काकांकडे जायचे सांगून तिचा भाऊ रमाकांत यादव आणि आतेभाऊ मनोज तिला घेऊन ३१ डिसेंबरला कल्याण रेल्वेस्थानकात उतरले. तर मुंबईतला सख्खा भाऊ तीर्थराज कल्याण रेल्वेस्थानकावर अगोदरच पोहोचला. त्यांनी रेल्वेयार्डाजवळच्या झुडुपांत नेऊन मनिताचा गळा आवळला. २ जानेवारीला कोळसेवाडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी तीर्थराजला ११ जानेवारीला अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून या कटाची माहिती उघड झाली. त्यानुसार, मनिताचे वडील लौटू, भाऊ रमाकांत, आणि आतेभाऊ मनोज यादव यांना सोमवारी अटक केली. तिन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाईल.
मुलीची हत्या, वडिलांसह ३ भाऊ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 4:50 AM