ठाणे : नागरिकत्व कायदा (सीएए) व एनआरसी या केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त व आदिवासींच्या ४८ संघटना लवकरच संघर्ष करण्याकरिता रस्त्यावर उतरणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातील ९८ टक्के भटक्या विमुक्तांकडे नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तब्बल दोन कोटी भटके विमुक्त आपले नागरिकत्व सिद्ध कसे करणार, असा सवाल करीत आव्हाड म्हणाले की, यामुळे येत्या काळात या कायद्याविरोधात रक्तरंजित संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.आव्हाड म्हणाले की, चातुर्वर्ण्य मानसिकतेमुळे इथली व्यवस्था भटक्या विमुक्त समाजाला अजूनही स्वीकारत नाही. ग्रामसभेत ठराव करूनही भटक्या विमुक्तांना तीन दिवसांपेक्षा जास्त काळ गावात राहू दिले जात नाही. यामुळे भटके विमुक्त शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत. मृत्यू झालेल्यांचा दफनविधी अथवा सरणविधी गुपचूप करावा लागतो. घर नाही, जमीन नाही, गाव नाही, या स्थितीमुळेच सरकारने नेमलेल्या आयोगांनी ९८ टक्के भटक्या विमुक्तांकडे जन्मदाखला, रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखे पुरावे नाहीत. या कागदपत्रांअभावी नागरिकत्व कायद्याखाली दोन कोटी भटक्या विमुक्तांना डिटेन्शन कॅम्पमध्ये कोंबणार का? ही केवळ हिंदू-मुसलमान लढाई नाही, तर जातीव्यवस्थेविरोधातील लढाई आहे. विमुक्त हे उमाजी नाईकांचे वारसदार आहेत. यामुळेच नागरिकत्व कायद्याविरोधात भटके विमुक्त वेळप्रसंगी रक्तरंजित संघर्षही करतील, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीमानवी हक्क अभियानाचे प्रमुख व एकनाथ आव्हाड यांचे पुत्र मिलिंद आव्हाड ऊर्फ जनजागृती, आदिवासी पारधी समाज संघटनेचे राजेंद्र काळे, सुनीता भोसले, अजित भोसले, नितीन भोसले, माणिक वाघ, ज्ञानदेव वाघ आदिवासी पारधी विकास परिषदेचे नूरकास बिर्याणी भोसले, बंड्या चिंग्या भोसले, नेनी अभय काळे, भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन, पुणे या संघटनेच्या वैशाली भांडवलावर, रामोशी समाजाचे संतोष जाधव, प्रवीण नाईक, डावरी गोसावी समाजाचे भालचंद्र सावंत, वडार समाजाचे भारत विटेवर, ललिता धनवटे, बंजारा समाजाचे अंबरसिंग चव्हाण, राधेश्याम अडे, उल्हास राठोड, पारधी समाजाचे ईश्वर काळे, वैदू समाजाचे मानवेंद्र वैदू, गोसावी समाजाचे बालाजी तांबे, जोशी समाजाचे दिलीप परदेशी, आदिवासी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या सिल्लोड येथील मराठवाडा विभागाध्यक्ष शिवाजी कडुबा शेळके तसेच विजय रामलाल सुरवसे, फुलंब्री, संतोष दळे, औरंगाबाद तेजराव शेळके, सिल्लोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भटक्या विमुक्त-आदिवासींच्या ४८ संघटना एकवटल्या- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:33 AM