ठाणे : साडेचार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गळा दाबून हत्या करणाऱ्या मोहम्मद आबेद मोहम्मद अजमीर शेख याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. ही घटना १ एप्रिल, २०१८ रोजी घडली होती.आरोपी मोहम्मद आबेद शेख हा पॉवरलूम कामगार असून, भिवंडीतच वास्तव्यास आहे. त्याला घटनेच्या आठ महिन्यांपूर्वी गुटख्याची उधारी देत नसल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपीने त्याच्या साडेचार वर्षीय मुलीला लाडीगोडीने बोलावून पळवून नेले. आरोपीने भिवंडीतील रोशनबाग परिसरातील झुडपामध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, तिचा गळा दाबला आणि डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचाही त्याने प्रयत्न केला. भिवंडी येथील भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून १० एप्रिल रोजी त्याला अटक केली. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सिन्हा यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी सादर केलेले पुरावे आणि २२ साक्षीदारांची साक्ष ग्राह्यधरून न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार; डोक्यात दगड घालून घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:11 PM