पंकज रोडेकर, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात बलात्काराच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण हे तिप्पट आहे. ग्रामीण भागात दाखल झालेले शंभर टक्के गुन्हे उघडकीस आले असताना, शहरी भागात ते ९५ टक्के असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. यात कल्याण परिमंडळात सर्वाधिक गुन्हे घडले असून यातील आरोपी शेजारी, ओळखीचे व्यक्ती अथवा नातेवाईकांचे प्रमाण जास्त असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई वगळता जिल्ह्यातील या दोन्ही पोलीस दलात २०१५ या वर्षात (दहा महिन्यात) ३०० गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण असे दोन पोलीस दल आहेत. ग्रामीण भागात १७ पोलीस ठाणी असून ती ठाणी चार विभागात विभागली आहेत. त्याचप्रमाणे शहर पोलीस दलात ३३ पोलीस ठाणी असून ती पाच परिमंडळात विभागली आहेत. त्या त्या पोलीस ठाण्यांतर्गत २०१५ मधील जानेवारी ते आॅक्टोबर दरम्यान बलात्काराचे एकूण ३०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी २८६ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर दुसरीकडे शहर पोलीस दलाला शंभर टक्के रिझल्ट राखता आला नसला तरी २२३ पैकी २०९ गुन्हे आणले आहेत. भिवंडी परिमंडळात दाखल झालेले सर्वच गुन्हे उघडकीस आले आहेत. तर ठाणे शहरातील ४, कल्याणात- ५, उल्हासनगर-४ आणि वागळे इस्टेट-१ असे १४ गुन्ह्यातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. ग्रामीण भागातील एकूण दाखल झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण हे शहर पोलीस दलातील एकट्याच कल्याण परिमंडळात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांइतके आहेत. तसेच दोन्ही दलात बलात्काराच्या गुन्ह्यात गतवर्षांप्रमाणे यंदाही वाढ झाली आहे.
जिल्ह्यात दहा महिन्यांत बलात्काराचे ३०० गुन्हे
By admin | Published: December 10, 2015 1:51 AM