ठाणे - ठाण्यातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवातून कोविड रुग्णांसाठी उपक्रम राबविला. बाप्पासाठी हारफुले, पेढ्यांऐवजी गणेशभक्तांना बाप्पाच्या चरणी शहाळे अर्पण करण्याचे आवाहन करून विसर्जनानंतर संकलित केलेली ३०० हून अधिक शहाळी कोरोनाबाधित रुग्णांना दिली. शहाळे हे आरोग्यासाठी चांगले असून गोरगरीब कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी म्हणून हा उपक्रम राबविला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले. त्यानुसार, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अटी आणि नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा केला, करीत आहे.वागळे इस्टेट येथील अनेक मंडळांनी १० दिवसांचा गणेशोत्सव दीड दिवसांवर आणला. कोरोनामुळे संसर्ग होऊ नये म्हणून या मंडळांनी हा निर्णय घेतला. काहींनी आरोग्योत्सव म्हणून हा उत्सव साजरा केला. याच परिसरातील जय बजरंग बालमित्र मंडळाने यंदा कोरोनाग्रस्तांसाठी आपला उत्सव साजरा केला. ‘यंदाच्या वर्षी एक निर्धार करू, श्रीचरणी हार-पेढे वाहण्यापेक्षा आपण बाप्पाचरणी एक शहाळे अर्पण करू’ अशी साद गणेशभक्तांना घातली. त्यांच्या आवाहनाला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ३०० हून अधिक शहाळी संकलित केली. ती विसर्जनानंतर बाळकुम येथील कोरोनाग्रस्त रुग्णांना देण्यात आली.दरम्यान, दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाने यंदा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दीड दिवसांचा उत्सव साजरा केला. २२ फुटांऐवजी दोन फुटांची शाडूमातीची मूर्ती स्थापन केली. तसेच, विसर्जनही मंडपातच केल्याचे मंडळाचे ऋषी पाटील याने सांगितले.‘गरिबांना फळे घेणे परवडत नाही’जे गोरगरीब या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांना फळे विकत घेणे परवडत नाही. शहाळे हे रुग्णांच्या आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. आपण रुग्णालयात जाताना त्यांना शहाळे घेऊन जातो म्हणून ही संकल्पना मंडळाला सुचली आणि ती अमलात आणली असल्याचे मंडळाचे ऋषी पाटील याने सांगितले.
बाप्पाला अर्पण केलेली ३०० शहाळी कोविड रुग्णांना, गणेशोत्सवातून घेतली रुग्णांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 2:30 AM